आदिवासी भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:31+5:302021-07-24T04:08:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डेहणे : खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डेहणे : खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे भात पिकांचे झाले आहे. या नुकसानग्रस्थ भागाची पाहणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पासनरे यांनी केली. या सोबतच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली. लवकरतात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आवाहन त्यांनी केले.
अतिवृष्टीमुळे खेडचा पश्चिम भाग जलमय झाला आहे. ठिक ठिकाणी ताली, बांध वाहुन गेले तर अनेक पुल तुटले आहेत. त्यांचे भराव वाहुन गेले आहेत. नायफड येथील मोठा बंधारा फुटल्याने शेकडो एकर शेती वाहुन गेली आहे. भोरगीरी येथील अनेक बांध फुटले असुन जमीन वाहुन गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. धुवोली, पाबे, भिवेगाव, टोकावडे, वांजाळे, डेहणे येथील शेती चे पुरामळे नुकसान झाले आहे.
मंदोशी - जावळेवाडी (ता. खेड) या दोन गावांना जोडणारा रस्ता मोरी वाहून गेल्याने जावळेवाडीचा संपर्क तुटला आहे. घटनास्थळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेत हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून दळणवळणास खुला करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. तसेच तालुकास्तरावर संबंधीत अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
याप्रसंगी माजी सभापती अरुण चांभारे, सुजाता पचपिडं, जिल्हा दूध संघाचे संचालक लक्ष्मण तिटकारे, किरण वांळुज, सरपंंच बबन गोडे,सरपंंच दत्ता खाडे, बांधकाम विभागाचे अधिकारी एल बी जोशी, सार्वजनिक बांधकाम अभियंता मधुकर भिंगारदेवे, ग्रामसेवक लेडें व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : मंदोशी-जावळेवाडी (ता. खेड) येथे वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे.
फोटो : खेड तालुक्यातील नुकसानग्रस्थ भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देतांना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि कृषी आणि पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर.