शेतकऱ्यांचे बांधाचे वाद संपुष्टात येणार; नकाशे मोबाइलवर, पहिला प्रयोग वाशिममध्ये
By नितीन चौधरी | Published: April 4, 2023 12:26 PM2023-04-04T12:26:01+5:302023-04-04T12:26:11+5:30
आता जमीन मोजणीच्या नकाशावर अक्षांश-रेखांशाचा असेल उल्लेख
नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : राज्यात जमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद थांबावेत, यासाठी भूमी अभिलेख विभागातर्फे मोजणी नकाशालाच अक्षांश व रेखांशाची जोड देण्यात येणार काही दिवसात शेतकऱ्यांना आपले शेतीचे नकाशे मोबाइलवर पहायला मिळणार आहेत. राज्यातील पहिला प्रयोग वाशिम जिल्ह्यातील गुंज गावात करण्यात आला आहे. तेथे या पद्धतीचा पहिला नकाशा देण्यात आला.
जमीन मोजणीसाठी आता राज्यभर रोव्हर यंत्रांची मदत घेण्यात येत असून, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून या पद्धतीने मोजणी सुरू झाली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात १५ एप्रिलपासून मोजणीचे काम रोव्हर यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी ९०२ रोव्हर यंत्र राज्याला मिळाली आहेत. त्यातील ५०० यंत्रांची खरेदी नुकतीच करण्यात आली आहे, तर ४०० यंत्रे जिल्हा नियोजन समितीमार्फत खरेदी केली आहेत.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ६९, तर हिंगोली व धुळ्यात सर्वांत कमी १० रोव्हर यंत्र दाखल झाली आहेत. राज्याला आणखी ७०० ते ८०० रोव्हर यंत्रांची गरज असून, पुढील काही दिवसांत ६०० रोव्हर यंत्र खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
वैधता कायमस्वरूपी
- या ऑनलाइन नकाशाची वैधता अक्षांश, रेखांश मिळाल्यानंतर कायमस्वरूपी राहणार आहे. नकाशावरील अक्षांश, रेखांश सर्वांना दिसेल. त्याची पडताळणी करायची असल्यास जीपीएसद्वारे, मोबाइलद्वारे तुमच्या जमिनीच्या मिळकतीच्या सीमा पाहू शकाल.
देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, चार ते पाच महिन्यांमध्ये संबंध राज्यांत याची अंमलबजावणी पूर्ण होणार आहे. -निरंजन कुमार सुधांशू, आयुक्त, जमाबंदी व भूमिअभिलेख संचालक