बॅँकेच्या दारात शेतकऱ्याचा दशक्रिया विधी
By admin | Published: June 4, 2016 12:35 AM2016-06-04T00:35:35+5:302016-06-04T00:35:35+5:30
नामदेव झगडे या शेतकऱ्याने कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे आत्महत्या केली, असा आरोप झगडे कुटुंबीयांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
बारामती : काझड (ता. इंदापूर) येथील नामदेव झगडे या शेतकऱ्याने कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे आत्महत्या केली, असा आरोप झगडे कुटुंबीयांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दोन्ही शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. ३) सकाळी १० वाजता युको बँकेच्या दारातच झगडे यांचा दशक्रिया विधी केला. मात्र, मृत शेतकरी आमच्या बँकेचे थकबाकीदार नव्हते, अशी माहिती बॅँक व्यवस्थापनाने दिली आहे.
शेतकरी झगडे यांचा दि. २६ मे रोजी मृत्यू झाला. त्यांनी बँकेच्या तगाद्यामुळे आत्महत्या केली, असा झगडे कुटुंबीयांसह शेतकरी संघटनांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या दारातच दशक्रिया विधी करून आंदोलन करण्यात आले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण म्हणाले, की आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. शिंदेवाडी गाव ५० टक्के पैसेवारीच्या खाली आहे. त्यानंतरदेखील बँकेने वसुलीचा तगादा लावला. रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले, की बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी केलेले दावे त्वरित मागे घ्यावेत. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्यास अंत्यविधी बँकेच्या दारात करण्यात येतील. या वेळी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष अमर कदम यांचे भाषण झाले. या वेळी झगडे कुटुंबांसह नीलेश देवकर, विठ्ठलराव देवकाते, ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर, शहाजी झगडे, नितीन भोईटे, नामदेव झगडे आदी उपस्थित होते.
वारसाला बँकेत
नोकरीस घ्यावे...
मृत शेतकरी नामदेव झगडे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर बँकेत कामावर घ्यावे. त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी बँक व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे शेतकरी संघटनांनी केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास झगडे यांचा १३ वा विधीसह इतर विधी प्रतीकात्मक आंदोलन म्हणून करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
अध्यादेशाबाबत
अधिकारी अनभिज्ञ..
५० टक्के पैसेवारी असणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करता येत नाही. याबाबत शासनाचा अध्यादेश आहे. हा अध्यादेश बँक अधिकाऱ्यांना या वेळी दाखविला. मात्र, त्याबाबत माहिती नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बँक अधिकारी शासनाच्या अध्यादेशाला महत्त्व देत नसल्याचा आरोप रायते यांनी केला.
मृत शेतकरी बॅँकेचे थकबाकीदार नव्हते : व्यवस्थापक
युको बँकेच्या प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मृत नामदेव झगडे हे आमचे थकबाकीदार नाहीत. तसेच, त्यांचे छायाचित्रदेखील बँकेत लावले नव्हते. त्यांचे भाऊ बँकेचे थकबाकीदार आहेत. त्यांना सूचना करण्यासाठी आमचे संबंधित कर्मचारी गेले असतील. मात्र, झगडे यांना आम्ही कोणतीही नोटीस पाठविली नाही. तसेच, कोणताही त्रास दिला नाही, असे बँक व्यवस्थापक एकाग्रप्रकाश त्यागी यांनी सांगितले.