शेतकरी कुटुंबातील सोनाली झाली कृषी अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 04:13 PM2018-05-18T16:13:32+5:302018-05-18T16:19:25+5:30
शेलपिंपळगाव/चाकण : शेलपिंपळगाव ( ता.खेड ) येथील शेतकरी कुटुंबातील सोनाली दिनकर पोतले हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कृषिसेवा परीक्षा २०१७ या परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिची कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून मराठी माध्यमातून शिकलेली व एकत्र कुटुंबात वाढलेली सोनाली हिच्या निवडीमुळे सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या कुटुंबीयांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. शेलपिंपळगाव येथील श्री शिवाजी विद्यालयात तिचे शालेय शिक्षण झाले असून तिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे एम एस्सी ऍग्री चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंगेश हिंगणे सरकार मित्र परिवार, तिचे चुलते सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पोतले, बंधू संजय पोतले, माऊली पोतले, वैभव पोतले आदी मान्यवर उपस्थित होते.