वरुणराजाने विश्रांती घेतली तरच बळीराजाची दिवाळी होणार गोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 02:17 PM2022-10-18T14:17:20+5:302022-10-18T14:17:36+5:30
सततच्या पावसामुळे पुरेशा प्रमाणात आवक नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
रविकिरण सासवडे
बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा जादा दर सध्या मिळत आहे. मात्र, सततच्या पावसामुळे पुरेशा प्रमाणात आवक नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आता पाऊस थांबला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
सततच्या पावसाने काढणीला आलेल्या खरीप हंगामातील पिकांना मोठा तडाखा बसला आहे. असे असले तरी बारामती बाजार समितीमध्ये सूर्यफूल, सोयाबीन व मका या पिकांना चांगला दर मिळत आहे. दर मिळत असला तरी आवक कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सध्या पावसामुळे पुरेसे ऊन काढलेल्या शेतमालाला मिळत नाही. परिणामी, धान्यात आर्द्रता राहिल्याने शेतमाल खराब होण्याचा धोका वाढला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी सोयाबीन, मका, सूर्यफुल आदी पिकांची आवक होत आहे. मात्र, सततच्या पावसामुळे ही आवक घटली आहे.
दर चांगला असला तरी काढलेल्या धान्याला पुरेसे ऊन मिळत नाही. परिणामी, पाण्याचे प्रमाण राहिल्यास आर्द्रता वाढून धान्य खराब होण्याचा धोका आहे. बारामती तालुक्यामध्ये यंदा सोयाबीन, सूर्यफूल तसेच मका या पिकांखालील क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली होती. सोयाबीनला यंदा राज्य शासनाने ३ हजार ९५० रुपये प्रतिक्विटंल हमीभाव दिल्याने सोयाबीनच्या पेरण्या वाढल्या होत्या. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ८७० एवढा बाजारभाव बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत आहे.
''बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त असला तरी पुरेसे सोयाबीन विक्रीसाठी येत नाही. सोयाबीनची आर्द्रता ८ ते १० पर्यंत लागते. मात्र, सध्या १८ ते २५ पर्यंत आर्द्रतेचा माल बाजारात येत आहे. सततचा पाऊस असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाळवण्यासाठी संधी नाही. त्यामुळे सोयाबीन खराब होण्याचादेखील धोका शेतकऱ्यांसमोर आहे. - अमोल शहा (अध्यक्ष, दी मर्चंट असोसिएशन, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती)''
''सोयाबीन भिजले तर लवकर खराब होण्याचा धोका असतो. बारामती परिसरात सतत पाऊस आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे पुरेसे ऊन धान्याला मिळत नाही. गुणवत्तापूर्ण धान्य बाजारात आले तर त्याला चांगला दर मिळत आहे. मात्र, अशा धान्याची आवक खूप कमी आहे. - अरविंद जगताप (सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती)''