वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:29+5:302021-04-05T04:10:29+5:30
मंचर:वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. विशेषत: श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील महावितरण कंपनीच्या सब स्टेशनची दुरुस्ती ...
मंचर:वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. विशेषत: श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील महावितरण कंपनीच्या सब स्टेशनची दुरुस्ती झाली नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो. परिणामी, शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही. इतर व्यवसायावर परिणाम झाला आहे. वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा साकोरे गावचे सरपंच अशोक मोढवे यांनी दिला आहे.
श्रीक्षेत्र वडगाव काशिबेंग येथे महावितरण कंपनीचे ३३/११ केव्हीचे सबस्टेशन आहे.येथे २०१७ मध्ये नवीन ५ एमव्हीचा ट्रान्सफारमर बसविला गेला. त्यावर परिसरातील साकोरे, सुलतानपुर,वाळुंजवाडी हे तीन ११ केंव्ही फिडर काढले गेले. परतुं ४ वर्षांत अधिकाऱ्यांनी यातील १ सुध्दा फिडर चालू केला नाही. दरमहा सबस्टेशन देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळाला जातो. पण एवढे मोठे काम होऊन सुद्धा अधिकाऱ्यांच्या हालगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना सतत वीजटंचाईचा सामना करावा लागतो. दिवसातील ८ तासातून १ तास सुध्दा शेतकऱ्यांना वीज मिळत नसेल तर महावितरण विरोधात आंदोलन करण्याचा इशारा साकोरे, सुलतानपुर,वाळुंजवाडी,वडगाव काशिबेंग,चिंचोडी देशपांडे कोळवाडी,चास येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या मोर्चाचे नियोजन करून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवुन आंदोलन केले जाईल असा इशारा साकोरे गावचे सरपंच अशोक मोढवे यांनी दिला आहे.
विजेअभावी ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था शेतकऱ्यांची महावितरण कंपनीने केली आहे.दिवसातून क्षुल्लक कारणासाठी अनेक वेळा वीजपुरवठा बंद केला जातो. साधा एलटी लाईनचा जंप जोडायचा असेल तरी सुद्धा पुरवठा बंद केला जातो.वडगाव काशिंबेग येथील सबस्टेशनमधील अनेक पार्ट जळाल्यामुळे ३३ केव्हीएचा इन्कमर सप्लाय बंद केला जातो व ब्रेकरचे सर्व पार्ट जळाल्यामुळे व योग्य त्या प्रकारे शेती फिडर,गावठाण फिडर वेगळे नसल्यामुळे विजेचा दाब कमी जास्त होऊन अनेकांची घरची उपकरणे,विहिरीवरील मोटारपंप जळतात.हे सर्व महावितरण कंपनीचे अधिकारी व कामातील त्रुटी यामुळे घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.