आपत्तीग्रस्तांना कृषिकन्यांची मदत; लोकवर्गणीतून ७५ हजारांचे सहाय्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:00 PM2018-08-21T23:00:08+5:302018-08-21T23:20:32+5:30
केरळ राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषिकन्यांनी भरीव मदत केली आहे
उरुळी कांचन : केरळ राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषिकन्यांनी भरीव मदत केली आहे. आर्थिक मदत म्हणून ७५ हजार रुपयांची रक्कम ग्रामस्थांकडून लोकवर्गणी स्वरूपात गोळा करून पूरग्रस्तांना पाठविली आहे.
शिंदवणे (ता. हवेली) गावात कृषी अभ्यास वर्गासाठी या कृषिकन्या तात्पुरत्या स्थायिक झाल्या आहेत. केरळमध्ये महाभयंकर पुराने राज्यभरातील सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. परिणामी पूरग्रस्त नागरिकांना जीवन जगणे अडचणीचे झाले आहे.
अभ्यास वर्गातील कृषिकन्या अनिया एलिझाबेथ थॉमस ही मूळची केरळ राज्यातील आहे. पुणे कृषी महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. सध्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिंदवणे गावात कार्यरत आहे. तिच्या प्रेरणेतून सहकारी मैत्रीणी निकिता बागल, सृष्टी धुमाळ, सुप्रिया भिसे, विमल धायगुडे, प्रियश्री भंडारी, अमृता अहिवळे व ग्रामस्थांच्या माध्यमातून वर्गणी गोळा करून ही रक्कम उभी केली आहे. ग्रामस्थांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील काही परिचित सामाजिक संस्था व मान्यवरांकडून पेटीएम, तेज व भीम अॅपच्या माध्यमातून या कृषिकन्यांनी मदत गोळा केली आहे. ही मदत आर्मी व नेव्ही कॅन्टोन्मेट बोर्ड पुणे यांच्या माध्यमातून गरजेच्या वस्तूस्वरूपात पूरग्रस्तांना पाठविणार आहे.