हिवरे येथील शेतकऱ्यांचा रेल्वे प्रकल्पाला तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:24+5:302021-07-21T04:10:24+5:30
खोडद : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
खोडद : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असून, सुमारे ९९ शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे. दरम्यान, हिवरे हद्दीत रेल्वे प्रकल्पासाठी चालू असलेले सर्वेक्षणाचे कामदेखील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.
याबाबत माहिती अशी की, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प हिवरे गाव व परिसरातून जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.या प्रकल्पासाठी सुमारे २५ हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात येणार आहे. मात्र याबाबत शेतकऱ्यांना कुठलीही नोटीस बजावण्यात आलेली नाही.
दरम्यान, हिवरे गावातील सुमारे ९९ शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी विरोध केला असून, याबाबत त्यांनी हरकतीचे निवेदन प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर यांना दिले आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी आमच्या शेतजमिनी घेऊन आम्हांला भूमिहीन करू नका, अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी संजय भोर, अवधूत बारवे, विलास खोकराळे, सुभाष खोकराळे, शिवदास खोकराळे, सुरेश शिंदे, संतोष खोकराळे, विशाल भोर यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिवरे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना पुनर्वसनाचे शेरे असून, त्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवल्या आहेत. यामुळे आधीच अनेकांचे क्षेत्र कमी झालेले आहे. त्यात हा प्रकल्प येथून गेल्यास शेतकरी अधिक अल्पभूधारक होणार आहेत. हिवरे परिसरातील शेतजमिनी बारमाही बागायती आहेत. द्राक्ष, ऊस,टोमॅटो,पपई, सीताफळ,डाळिंब,भाजीपाला अशी नगदी पिके घेतली जातात. हिवरे परिसरातील अनेक शेतकरी हे नोकरीला नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच आहे.
या परिसरातून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पामुळे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते भूमिहीन होणार आहेत. तर काही शेतकरी अल्पभूधारक होणार आहेत.तसेच या प्रकल्पामुळे प्रामुख्याने येथील शेतीचे असंख्य तुकडे होणार आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांची शेती वरच उपजीविका आहे आणि शेती हेच उपजीविकेचे एकमेव साधन आहे.अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँकांचे कर्ज देखील घेतलेली आहेत.अनेक शेतकऱ्यांना अत्यंत कमी शेत जमीन आहे.येथून जाणाऱ्या रेल्वेमुळे येथील शेतकरी हे उघडे होणार आहेत, म्हणून येथील शेतकऱ्यांचा या रेल्वेप्रकल्पाला तीव्र विरोध आहे
हिवरे तर्फे नारायणगाव येथून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असून याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर यांना दिले.