पुणे जिल्ह्यात शेतकरी स्वतःच जाळतायत शेतातील ऊस? नेमकं कारण काय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 02:07 PM2023-01-23T14:07:41+5:302023-01-23T14:09:38+5:30
उजनीकाठावर ऊस जाळून तोडण्याचा सपाटा, शेतकऱ्यांचे नुकसान...
पळसदेव (पुणे) : पळसदेव भागासह इंदापूर तालुक्यात अनेक भागांत ऊस तोडून नेण्यासाठी प्रतिएकरनुसार ऊसतोडणी कामगारांना पैसे देण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे. तर ऊस वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरला दररोज २०० रुपये भत्ता असा दररोज हजारो रुपये खर्च करण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. एवढे करूनही ऊसतोडणी कामगारांनी सध्या ऊस पेटवून तोडण्याचा सपाटा लावला असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पोटच्या पोरागत दीड वर्ष सांभाळलेल्या उसाला डोळ्यादेखत जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात ऊस जाळून तोडला जात असल्याचे चित्र आहे, त्यामुळे जळिताचा ऊस गाळपाला गेल्यावर शेतकऱ्याचे प्रतिटनानुसार नुकसान होत आहे. सध्या रोगग्रस्त नसलेलादेखील ऊस पेटवून तोडण्याचा सपाटा उजनी काठावर सुरू आहे. याबाबत कारखाना प्रशासनाने लक्ष देण्याची आवशकता निर्माण झाली आहे. उजनी पट्ट्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. सध्या नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे शेतातील ऊस लवकर गाळपासाठी जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे ऊस घालवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. काही ठिकाणी उसाला तुरे येऊन स्थिर झाले आहेत. उसाचे वजन घटत आहे. मात्र, शेतकऱ्याच्या अडचणींचा गैरफायदा घेण्याचे काम ऊसतोडणी कामगार व ऊस वाहतूक करणारे मालक घेत आहेत.
अनेक शेतकरी चांगल्या प्रतीचा ऊस खाजगी कारखान्याला गाळपाला देत आहेत व रोगग्रस्त ऊस कर्मयोगी कारखान्याने न्यावा अशी अपेक्षा करत आहेत. सहकार टिकवणे सर्वांची जबाबदारी आहे. रोगग्रस्त ऊस तोडणे कामगारांना त्रासदायक आहे, त्यामुळे ऊस पेटवून तोडला जात आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचादेखील ऊस कर्मयोगी कारखान्याला गाळपासाठी द्यावा व इतर रोगग्रस्त ऊसदेखील कारखाना गाळपासाठी नेणार आहे. एकाही सभासदाचा ऊस राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
- भूषण काळे (संचालक, कर्मयोगी सहकारी कारखाना)