उसाचे दर उतरल्याने शेतकरी अडचणीत
By Admin | Published: January 13, 2017 01:54 AM2017-01-13T01:54:07+5:302017-01-13T01:54:07+5:30
साखर कारखान्याचे गळीत हांगाम संपताच गुऱ्हाळ चालकांनी उसाचे दर उतरविल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जोपर्यंत
राहू : साखर कारखान्याचे गळीत हांगाम संपताच गुऱ्हाळ चालकांनी उसाचे दर उतरविल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
जोपर्यंत अनुराज शुगर व श्रीनाथ म्हस्कोबा या दोन खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम चालू होता तोपर्यंत गुऱ्हाळ चालकांनी उसाला तीन हजार शंभर रुपय प्रतिटन दर दिला होता. परंतु दि.९ रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा गाळप हंगाम बंद होतो ना होतो, तोच गुऱ्हाळ चालकांनी सर्व गुऱ्हाळचालक, ऊस वाहतूक व ऊस खरेदीदारांची बैठक घेऊन हा दर तब्बल अठ्ठाविशे रुपये करून प्रतिटन तीनशे रुपये इतका फटका शेतकऱ्यांना दिला आहे. अपुऱ्या उसामुळे साखर कारखाने बंद झाल्यावर उसाला गुऱ्हाळ चालकांकडून चांगला दर मिळेल म्हणून राहू बेट परिसरातील शेतकऱ्यांनी एक लाख टनाच्या जवळपास ऊस साखर कारखान्यांना न देता राखून ठेवला आहे. अनुराज शुगरने १ लाख ११ हजार २२२ टन गाळप, तर श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने १ कोटी ९२ लाख ९११ टन गाळप पूर्ण केले आहे. परंतु राहू बेट परिसारात शिल्लक उसाचा प्रश्न पडलेल्या दरामुळे अडचणीचा ठरणार आहे. कोरेगावभिवर येथील शेतकरी बन्सिलाल फडतरे म्हणाले, ‘‘गुऱ्हाळ चालकांकडून अशी अडवणूक होण्याचे हे दुसरे वर्ष आहे. साखर कारखाने चालू असेपर्यंत हे गुऱ्हाळ चालक ऊस शिल्लक राहावा म्हणून साखर कारखान्यापेक्षा जादा दर देतात व साखर कारखान्याचा हांगाम संपला की, युनिअन करून दर खाली आणतात व मग यामधून शेतकऱ्यांची फसवणूक होते. जर गुऱ्हाळ चालक शेतकऱ्यांची अडवणूक करणार असतील तर हे आम्ही सहन करणार नाही. या विरोधात कायदेशीर लढा उभा करू.’’ (वार्ताहर)