खेड तालुक्यात वन्यजीवांकरिता पाण्याच्या टाक्या उभारण्यात शेतक-यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 04:45 PM2018-11-24T16:45:39+5:302018-11-24T16:49:51+5:30
वन्यजीवांचा हक्काचा अधिवास माणसाने हिसकावून घेतल्यानंतर त्यांंना अन्नपाण्याकरिता मानवी वस्तीत यावे लागले.
पुणे : वन्यजीवांचा हक्काचा अधिवास माणसाने हिसकावून घेतल्यानंतर त्यांंना अन्नपाण्याकरिता मानवी वस्तीत यावे लागले. याचा परिणाम म्हणजे बिबट्यासारख्या हिंसक प्राण्यांनी मानवावर हल्ले करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षात शेकडोहून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वन्यप्राण्यांनी पाण्याच्या शोधाच्या निमित्ताने का होईना मानवी वस्तीत येऊन उपद्रव करु नये, याकरिता आता खेड तालुक्यातील रानमळा गावातील शेतक-यांनी त्यांच्यासाठी डोंगरावरच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. तीन शेतक-यांनी पुढाकार घेवून बांधलेल्या या टाक्याच्या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
खेड तालुक्यातील रानमळा डोंगराळ भाग. याबरोबरच ब-यापैकी बागायती क्षेत्र, यामुळे वन्यप्राण्यांचा वावर तिथे दिसून येतो. ब-याचदा रात्री उशिरा पाणी पिण्याच्या निमित्ताने बिबट्या जवळपासच्या मानवी वस्तीत आल्याचे गावकरी सांगतात. भविष्यात हा धोका टाळुन कुठलीही जीवीतहानी होऊ नये यासाठी आता डोंगरावर तीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. यावर पाणी पिण्याक रिता मोर, लांडगे, कोल्हे आणि बिबटे येतात. मात्र खासकरुन बिबट्यापासून संरक्षणाकरिता याप्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. बिबट्याने पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत येऊन त्रास देऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. मागील दोन वर्षात दहापेक्षा अधिक जनावरांबर बिबट्याचा हल्ला झाला आहे. तसेच परिसरातील माणसांवर हल्ला करुन त्यांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे.
पाण्याच्या टाक्याच्या बांधण्यात बबन खडके, गेणूभाऊ भुजबळ व राजाराम शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच आपल्या खासगी विहीरीतून पाणीपुरवठा देखील केला आहे. तीन टाक्यांपैकी एक टाकी वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून बिबट्यापासून संरक्षण होण्याकरिता पाण्याच्या टाकीचा पर्याय गावक-यांनी निवडला होता. सध्याच्या दोन टाक्यांमध्ये दर दोन दिवसांनंतर विहीरीतून पाईपलाईनव्दारा पाणी सोडले जाते.
* मागील काही वर्षांपासून वन्यप्राणी व माणूस यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. टाक्यांच्या माध्यमातून त्या हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव कसा करायचा याक रिता टाक्यांची कल्पना पुढे आली. सध्या या पाण्याच्या टाक्या केवळ मोर, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे यांच्याबरोबरच बिबट्याकरिता मोठा आधार आहे. दोन नव्याने बांधण्यात आलेल्या टाक्या या पाच बाय पाच आकारातील आहेत. वनाधिकारी शुभांगी चव्हाण यांनी देखील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे.