Leopard Attack: शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 02:38 PM2021-11-02T14:38:08+5:302021-11-02T17:40:00+5:30
संबंधित व्यक्ती जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू
कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथे बिबट्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नारायण चिमाजी सरडे (वय ५५ रा. वाजेवाडी, भोंडवेवस्ती) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याचा मानवी वस्तीतला वावर दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले चढवले आहेत. मात्र मंगळवारी सकाळी वाजेवाडी हद्दीतील भोंडवेवस्ती परिसरात शेतात काम करणाऱ्या व्यक्तीवर थेट बिबट्याने झडप घातली. सुदैवाने लगतचे नवनाथ खुशाल भोंडवे, दत्ता भिवाजी भोंडवे, योगेश भरत भोंडवे यांनी घटनास्थळी धाव घेत मोठयाने आरडाओरडा केला. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी नारायण सरडे यांस प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या डोक्यावर, गालाला व घशाला मोठी दुखापत झाली आहे. दरम्यान, या घटनेने वाजेवाडीसह साबळेवाडी, सिद्धेगव्हाण गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मानवावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरे बसविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
खेड व शिरूर तालुक्यात ऊस पीकाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. सध्या ऊस तोडणी सुरु झाली आहे. त्यामुळे बिबटे बाहेर पडत आहेत. खेडलगतच्या कडूस गावात बिबट्याने माणसावर हल्ले केले आहेत. तर वृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. या घटनेनंतर वाजेवाडी येथे पुन्हा माणसावर हल्ला चढविल्याची घटना घडणे नक्कीच भीतीदायक आहे.