जुन्नर तालुक्यातील वादळी वाऱ्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले! पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:19 PM2021-05-17T12:19:59+5:302021-05-17T12:20:06+5:30
आळेफाटा पोलिसांकडून सतर्कतेच्या सूचना
वडगाव कांदळी: जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. सकाळपासूनच हवेचा जोर वाढल्याने घरांचे नुकसान होऊ लागले आहे. चक्रीवादळामुळे वाऱ्याचा जोर मधूनच वाढत आहे. तर कधीही जोरदार पाऊस येण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होईल. या भींतीने शेतकरी धास्तावला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा काढून ठेवला आहे. या चक्रीवादळाचा फटका शेतात काढून ठेवलेल्या कांद्याला बसू शकतो. त्यामुळे सकाळपासून कांदा आरणीत ठेवण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू होती. ज्यांना आरण नाही त्यांना कांदा शेतातच झाकून ठेवावा लागत आहे. अशा अस्मानी संकटाला शेतकरी हैराण झाला आहे. काही शेतामध्ये पेरलेला धना एक दोन दिवसात काढण्यात येणार आहे. चक्रीवादळ होणार असल्याने धना उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. या वादळामुळे जनावरांच्या चारा पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. एकंदरीतच वादळाचा व पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आळेफाटा पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी सांगितले की, वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे छप्पर उडण्याची शक्यता आहे. तसेच भिंत कोसळणे, झाडे, विजेच्या तारा पडणे अशा घटनाही घडू शकतात. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच झाडाखाली थांबू नये. विजेच्या तारा तुटल्यास तात्काळ संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.