चिरडल्याने शेतकरी महिला ठार
By admin | Published: March 28, 2017 02:03 AM2017-03-28T02:03:56+5:302017-03-28T02:03:56+5:30
रोकडोबादेवाच्या यात्रेला बिरदवडी येथे पायी निघालेली शेतकरी महिला ट्रक आणि बसच्यामध्ये चिरडली गेल्याने
आसखेड : रोकडोबादेवाच्या यात्रेला बिरदवडी येथे पायी निघालेली शेतकरी महिला ट्रक आणि बसच्यामध्ये चिरडली गेल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना चाकण येथील आंबेठाण चौकात सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली, तर अन्य एक पादचारी तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली.
छाया ऊर्फ बेबी संभाजी डफळ (वय ५३, रा. गवंडीवस्ती, धामारी, ता. शिरूर) असे या अपघातात ठार झालेल्या पादचारी शेतकरी महिलेचे नाव आहे, तर पुतिलाल रामसेवक (रा. दावडमळा, चाकण) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. संदीप शिवाजी जाधव (वय ४२, रा. बिरदवडी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे भरधाव जाणारी एसटी बस (एमएच १४ बीटी ४३६९) व आंबेठाण बाजूकडून आलेला व पुणे बाजूकडे वळणारा ट्रक (एमएच १४ ईएम ८३२४) या दोन वाहनांच्या मध्ये आंबेठाण दिशेने निघालेल्या पादचारी शेतकरी महिला डफळ ह्या अडकल्या आणि दोन्ही वाहनांमध्ये चिरडून डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाल्या.
चाकण ग्रामीण रुग्णालयात संबंधित महिलेच्या मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
याप्रकरणी नातेवाइकांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सोमवारी बिरदवडी गावाची यात्रा असल्याने छाया ऊर्फ बेबी डफळ या धामारी येथून यात्रेसाठी आल्या होत्या. मात्र, यात्रेला जाण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत गवारी व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
(वार्ताहर)
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ उपचारांसाठी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. छाया डफळ या चाकण एसटी बसस्थानकावरून शिवाजी चौकमार्गे आंबेठाण चौकातून पुढे बिरदवडी येथे रोकडोबा देवाच्या यात्रेनिमित्त नातेवाइकांकडे जात होत्या. त्यातच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
तसेच रामसेवक हा पादचारी तरुणही या वाहनांच्या मध्ये अडकून गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर येथील जयहिंद दवाखान्यात अतिदक्षता विभागात तातडीचे उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा ट्रकचालकासह एसटीचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.