शेतीचे ज्ञान देण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांची ‘नॉलेज बँक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:14 AM2021-09-15T04:14:01+5:302021-09-15T04:14:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कृषी विभागाने प्रगतिशील, शेतीनिष्ठ शेतकऱ्यांची नॉलेज बँक सुरू केली आहे. राज्यातील ५ हजारांपेक्षा जास्त अनुभवी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कृषी विभागाने प्रगतिशील, शेतीनिष्ठ शेतकऱ्यांची नॉलेज बँक सुरू केली आहे. राज्यातील ५ हजारांपेक्षा जास्त अनुभवी शेतकरी ही या बँकेची ठेव असून, त्यांचा उपयोग हजारो शेतकरी करून घेत आहेत.
कृषिमंत्री दादा भुसे यांच्या कल्पनेतून ही बँक साकार झाली आहे. कृषी खात्यातील विस्तार व प्रशिक्षण विभाग यासाठी समन्वयक म्हणून काम करत आहेत. उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार विजेते, प्रगतिशील शेतकरी, आधुनिक पद्धतीने शेती करणारे, अशा शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना या बँकेशी जोडून घेण्यात आले आहे. असे तब्बल ५ हजार शेतकरी सध्या बँकेशी जोडले गेले आहेत. त्यांचे नाव फोन नंबर व त्यांची शेती क्षेत्रातील कामगिरी अशी सर्व माहिती कृषी व त्यांच्याशी संबंधित विविध खात्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ज्यांना आपल्या शेतीतील कामाबाबत माहिती हवी आहे, असा कोणीही शेतकरी या यादीतील शेतकऱ्यांबरोबर संपर्क साधून, त्याला सल्ला विचारू शकतो. राज्यातून याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विस्तार व प्रशिक्षण विभागातून सांगण्यात आले. याशिवाय मंत्री स्तरावर यातील काही अनुभवी शेतकरी, प्रत्येक तालुक्यातील काही शेतकरी असा संयुक्त चर्चेचा ऑनलाइन कार्यक्रमही यात आयोजित करण्यात येत असतो. वेगवेगळ्या पिकांवर यात चर्चा घडविली जाते. यातून अनुभवांची देवाणघेवाण होते. याचाही अनेक शेतकऱ्यांना फायदा होत असल्याची माहिती देण्यात आली.
---
शेती यशस्वी करण्यासाठी या रिसोर्स बँकेचा चांगला उपयोग होत आहे. पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांची यादी आम्ही अद्ययावत ठेवत असतो. एखाद्या तज्ज्ञाने दिलेल्या सल्ल्यापेक्षाही शेतकऱ्यांना त्यांच्यासारख्याच दुसऱ्या शेतकऱ्याने दिलेला सल्ला अधिक विश्वासार्ह वाटतो.
- विकास पाटील, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी.