डाळिंब व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 03:13 AM2019-01-31T03:13:44+5:302019-01-31T03:14:54+5:30
१५ ते १७ कोटींची वसुली; प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती उघड
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब यार्डमधील आडत्यांनी डाळिंब उत्पादक शेतकरी आणि खरेदीदारांची हमाली आणि लेव्हीच्या माध्यमातून सुमारे १५ ते १७ कोटी रुपये अतिरिक्त पैसे वसुल केल्याप्रकरणी दोन आडत्यांचे परवाना निलंबित करण्यात आले आहेत. चारपैकी दोन आडत्यांचे परवाना निलंबित केले असले तरी उर्वरित दोन आडत्यांवर कारवाईला कधी मुहूर्त मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बाजारातील डाळिंब यार्डातील चार आडत्यांनी हमाली आणि लेव्हीच्या रकमेत नियमापेक्षा जास्त कपात केली. यात शेतकरी आणि खरेदीदारांची सुमारे १५ ते १७ कोटींची लूट झाल्याचे बाजार समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाने मार्केट यार्डातील संशयित आडत्यांच्या दफ्तर तपासणीचा निर्णय घेतला. आतापर्यंत ४१ संशयित आडत्यांची दफ्तरे ताब्यात घेतली आहेत. तसेच, दफ्तर तपासणीसाठी खासगी ८ सनदी लेखापालांची (सीए) नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे दफ्तर तपासणी सुरू आहे. आज दोन आडत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. दफ्तर तपासणीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.
अंतिम अहवाल लवकरच समोर येणार
शेतकरी आणि खरेदीदार यांच्या पट्टीतून अवैध रक्कम कपात केल्याप्रकरणी आडत्यांच्या दफ्तर तपासणीचा अंतिम अहवाल लवकरच समोर येईल. अंतिम अहवालात आडत्यांनी शेतकरी आणि खरेदीदार यांची किती अवैध रक्कम कपात केली आणि एकूण आकडा समोर येईल. त्यानंतर संबंधितांना त्यांचे पैसे दिले जातील, असे देशमुख यांनी यापूर्वीच सांगितले आहे.