‘सिजेंटा’वरचे शेतकरी आंदोलन रात्री उशिरा मागे
By admin | Published: July 6, 2016 03:16 AM2016-07-06T03:16:05+5:302016-07-06T03:16:05+5:30
सिजेंटा कंपनीचे अधिकारी गुरुवारी मंचर येथे येऊन टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले.
मंचर : सिजेंटा कंपनीचे अधिकारी गुरुवारी मंचर येथे येऊन टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले.
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाणेर (पुणे) येथील सिजेंटा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शेतकरी रात्री उशिरापर्यंत सिजेंटा कंपनीच्या कार्यालयात ठाण मांडून होते.
दरम्यान, कंपनीचे कार्यकारी संचालक बिपीन सोळंकी परदेशी गेले आहेत. त्याच्यांशी सिजेंटा कंपनीचे जिल्हा विक्री अधिकारी गौतम सांगळे यांनी संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी मंचर येथे येण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात गुरुवारी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन सांगळे यांनी दिले. जर गुरुवारी निर्णय झाला नाही, तर शेतकऱ्यांनी पुढील निर्णय घ्यावा, असे या वेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले. (वार्ताहर)
- सिजेंटा कंपनीचे अधिकारी मंचर येथे येऊन चर्चा करणार आहेत. कंपनीने शेतकऱ्यांच्या
भरपाईबाबत योग्य निर्णय घेतला नाही, तर त्याचे पडसाद उमटतील. भविष्यात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला कपंनी जबाबदार राहील असा इशारा शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.