शेतकऱ्यांचे सशक्तीकरण गरजेचे
By admin | Published: October 1, 2015 01:08 AM2015-10-01T01:08:37+5:302015-10-01T01:08:37+5:30
शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले आहे. त्यातून निराश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. अशा वेळी त्यांचे मानसिक सशक्तीकरण करणे गरजेचे आहे,
पुणे : शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले आहे. त्यातून निराश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. अशा वेळी त्यांचे मानसिक सशक्तीकरण करणे गरजेचे आहे, असे मत ब्रह्माकुमारी नलिनी दीदी यांनी व्यक्त केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे ‘अखिल भारतीय किसान सशक्तीकरण अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन धायरी गाव येथे करण्यात आले होते. त्या वेळी नलिनी दीदी बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे, ब्रह्माकुमार दशरथ भाई, सरपंच नितीन दुधाने, अंकुश बगाटे, नांदेड सिटीचे संचालक प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते.
नलिनी दीदी म्हणाल्या, की आज मॅन पॉवर, मनी पॉवर मटेरियल पॉवर आहे. पण त्याचबरोबर मेंटल पॉवरची आवश्यक आहे. तिचे बीजारोपण यौगीक शेतीच्या कार्यामध्ये केल्याने भारतभूमी सुजलाम सुफलाम होईल.
दशरथ भाई म्हणाले, की या अभियानाचे उद्घाटन १३ सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहनसिंंग यांच्या हस्ते दिल्ली येथे झाले असून, संपूर्ण देशभरात १३० अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, यौगीक शेती यावर मार्गदर्शन करणार आहे. हे अभियान पुणे ते जेजुरी असे असून, यामध्ये पुणे, सातारा, वाई-फलटण अशी १२१ गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात येणार असून, ते २ नोव्हेंबरला जेजुरीला समाप्त होणार आहे.
या वेळी विनयकुमार आवटे, डॉ. रजपूत, नवनाथ कोळपकर, नितीन दुधाने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ब्रह्माकुमारी सुलभा बहन यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)