Social Viral: दौंड तालुक्यातील शेतकऱ्याने केला 'तब्बल ५५ टन' ऊस वाहतुकीचा नवा विक्रम; पहा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:26 AM2022-04-19T10:26:07+5:302022-04-19T10:27:34+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात विक्रम केला असून सोशल मिडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.
पाटेठाण : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांंचे ऊस गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. म्हणूनच ऊसपिकाचे आगर म्हणून महाराष्ट्रात जिल्ह्याची ओळख कायम आहे. साखर उत्पादन, गाळप, साखर उतारा याबाबत देखील जिल्ह्यातील साखर कारखाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहेत. अशा प्रकारचे अनेक विक्रम साखर उद्योग क्षेत्रात चालू असताना आज एक नवा विक्रम झाला असून तो म्हणजे एका ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूकदार शेतकऱ्याने ट्रॅक्टर मधून पंचवीस नव्हे, तीस नव्हे, चाळीस नव्हे तर तब्बल पंचावन्न टन एकशे ऐंशी किलो ऊसाची वाहतूक करुन संपूर्ण महाराष्ट्रात विक्रम केला असून सोशल मिडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.
दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणारे तुळापूर (ता.शिरूर) येथील अंकुश खंडू शिवले असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या ऊस वाहतूक विक्रमाची नोंद जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात झाली आहे. ऊस वाहतूक करताना वाहतूकदार शेतकऱ्यांमध्ये कोण अधिक ऊस नेतो याच्या पैंंजा लागतात. आजतागायत ट्रॅक्टरच्या सहाय्याने पंचेचाळीस टनांपर्यंत वाहतूक केल्याचे ऐकीवात होते. परंतु पंचावन्न टन वाहतूकीचा नवा विक्रम झाला आहे. ऊसाची पंचावन्न टन वाहतूक केलेल्या घटनेवर कोणी शंका उपस्थित करेल म्हणून कारखान्याच्या वजन काट्यावर ऊसासह वजन केल्याची पावती देखील ठेवली आहे.
दौंड तालुक्यातील शेतकऱ्याने तब्बल 55 टन ऊसाची वाहतूक केली; व्हिडिओ व्हायरल #Pune#daundpic.twitter.com/Odyv6o9kFC
— Lokmat (@lokmat) April 19, 2022