इंदापूर उपसासिंचन योजना राबविण्याची मागणीसाठी शेतकऱ्यांचे सिंचनभवनवर उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 02:17 PM2024-08-23T14:17:34+5:302024-08-23T14:21:05+5:30

ग्रामीण भागातील शेतीला उन्हाळी आवर्तन मिळत नसल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे

Farmers on hunger strike at Chanchanbhawan to demand implementation of Indapur sub-irrigation scheme | इंदापूर उपसासिंचन योजना राबविण्याची मागणीसाठी शेतकऱ्यांचे सिंचनभवनवर उपोषण

इंदापूर उपसासिंचन योजना राबविण्याची मागणीसाठी शेतकऱ्यांचे सिंचनभवनवर उपोषण

कळस : खडकवासला धरणसाखळीतील पाण्यावरून पुणे शहर व ग्रामीण भागातील शेतकरी यांच्यात नेहमीच वाद होत आहे. ग्रामीण भागातील शेतीला उन्हाळी आवर्तन मिळत नाही. परिणामी शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.

त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजनी जलाशयावरुन उपसा जलसिंचन योजना राबविण्याची मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील सिंचन भवनसमोर शुक्रवारी (ता. २३) रोजी शेतकरी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी एका शेतकऱ्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली.

सकाळी ११ वाजता सिंचन भवन गेटसमोर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी बाबामहाराज खारतोडे, विजय गावडे,रमेश खारतोडे, निवृत्ती गायकवाड, दादासाहेब खारतोडे आकाश पवार यांची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाणी योजना मंजूर न झाल्यास आंदोलन आक्रमक करण्यात येईल असे सांगितले.

इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या जीवावरील ३६ गावे, सणसर कटच्या माध्यमातून पाणी मिळणारी २२ गावे अशा ६८ गावांतील शेतीसिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या काही वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या जीवावरील शेती व्यवसाय अनियमित आवर्तनामुळे अडचणीत आला आहे. कालव्याच्या पाण्याची शाश्वती राहिली नसल्याने, येथील शेतकरी हतबल झाले आहेत. खडकवासला धरणाच्या मूळ प्रकल्प आराखड्यातील मंजूर पाणी कोटा गेल्या कित्येक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना मिळला नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. यावेळी भाषणे चालु असताना एका युवा शेतकऱ्यानी बाटलीचे टोपण उघडून अंगावर बाटलीतील द्रव ओतून घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला.

Web Title: Farmers on hunger strike at Chanchanbhawan to demand implementation of Indapur sub-irrigation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.