पुणे-नाशिक रेल्वे मार्गास शेतकरीवर्गाचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:54+5:302021-09-27T04:12:54+5:30
आळेफाटा : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग बागायती क्षेत्रातून जाण्यास विरोध असल्याचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना रेल्वे ...
आळेफाटा : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग बागायती क्षेत्रातून जाण्यास विरोध असल्याचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना रेल्वे विरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने पुणे येथे देण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेणार असल्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग पूर्व हवेली, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतून जात असून या रेल्वेमार्गालाच शेतकरीवर्गाने विरोध केला आहे. याबाबत रेल्वे विरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व संबंधितांना निवेदन देण्यात आली, तसेच यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पुणे दौऱ्यात सर्किट हाऊस येथे रेल्वे विरोधी संघर्ष कृती समितीनग भेट घेतली. यावेळी बैठकी संपन्न झाली. याप्रसंगी माजी आमदार बाळा भेगडे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, रेल्वे विरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष नीलेश भुजबळ, अनिल वाघुले, खेड तालुका अध्यक्ष पाटील बुवा गवारी, प्रसाद घेनंद, राहुल शिंदे, दिनेश शिंदे, वसंत कुऱ्हाडे, गेनभाऊ हुलवळे, अमोल भुजबळ, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, अमोल हुलवळे, गणेश भोर व अनेक शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्यात आले, तर रेल्वे मार्ग बागायती क्षेत्रातून जात असून बाधित शेतकरी अल्पभूधारक आहेत. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात अनेक विहिरी, बोअरवेल, जनावरांचे गोठे, गाव, रस्ते जात आहेत. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याची भूमिका शेतकरी कृती समितीने मांडत या रेल्वे प्रकल्पास तीव्र विरोध असून तो शेवटपर्यंत राहणार असल्याचे सांगत यासाठी पर्यायी रेल्वे मार्ग करावा, अशी मागणी केली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच याबाबत निर्णय घेताना अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
260921\img-20210926-wa0098.jpg
रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे
यांना निवेदन देताना रेल्वे विरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी