पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला शेतकऱ्यांचा विरोधच, कितीही दबाव आणला तरी मोजणी होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:25+5:302021-07-29T04:10:25+5:30
वडगाव कांदळी : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम सध्या चालू असून बुधवारी (दि. २८)बोरी बुद्रूक(ता. जुन्नर)येथे जमिनीची प्रत्यक्ष मोजणी ...
वडगाव कांदळी : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम सध्या चालू असून बुधवारी (दि. २८)बोरी बुद्रूक(ता. जुन्नर)येथे जमिनीची प्रत्यक्ष मोजणी करण्यासाठी आलेल्या तालुक्याचे तहसीलदार, रेल्वे अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करून न देता माघारी पाठवले. या भागातील शेतकऱ्यांनी या रेल्वे प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.
बोरी बुद्रूक गावातून पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे जात असून, यासाठी महारेलने मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. आज या गावात तहसीलदार हुनुुमंत कोळेकर, महारेलचे उपमहाव्यवस्थापक शिरोळे, व्यवस्थापक मंदार विचारे, समन्वयक चंद्रकिशोर भोर, मंडलाधिकारी नितीन चौरे, तलाठी राजू बढे, कृषी अधिकारी सुजाता खेडकर हे अधिकारी मोजणीसाठी आले होते. त्यांना रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष नीलेश भुजबळ, बोरी बुद्रूक गावच्या सरपंच वैशाली जाधव, दत्तात्रय जाधव, शरद पिंगळे, आनंथा पिंगळे, अमोल कोरडे, दादाभाऊ वाजे, अनिल वाघोले, नामदेव शिंदे, गणेश वाजे, अशोक वाजे, दत्तात्रय वाजे, दिगंबर शिंदे, जितेंद्र हांडे, नामदेव शिंदे या शेतकऱ्यांनी मोजणीला कडाडून विरोध केला. मोजणीसाठी कृषी विभागाचे अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता हे उपस्थित होते.
जुन्नर तालुक्याच्या ज्या गावांमधून रेल्वे जात आहे, त्या भागातील जमिनीचे बाजारमूल्य काय हेच अजून ठरलेले नाही. जमीन संपादनात अनेक विहिरी जात असल्याने विहिरींना खर्चाच्या पाचपट जरी महारेलने नुकसानभरपाई दिली, तरी शेतकऱ्यांना उर्वरित शेतीसाठी ते परवडणारे नाही. आम्हाला कोणतीही पूर्व कल्पना न देता नोटिसा दिल्या आहेत. नोटीसामध्ये आम्हाला सांगण्यात आले आहे की, तुमची जमीन ही रेल्वेमध्ये जात आहे, असे सांगण्यात आले आहे. शासनाने आम्हा शेतकऱ्यांवर कितीही दबाव आणला तरीही आम्ही ही मोजणी होऊ देणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. याठिकाणी मोजणीसाठी आलेले तहसीलदार कोळेकर यांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली.
हायस्पीड रेल्वेला जुन्नर तालुक्यात मोठा विरोध
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यापूर्वी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हिवरे तर्फे नारायणगाव, वडगाव कांदळी व आता बोरी येथून मोजणी न करताच माघारी जावे लागले आहे. बोरी बुद्रूक येथे तर तहसीलदार यांची उपस्थिती असूनही शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी होऊ दिली नाही.
बागायती शेतीमुळे विरोध मोठा
जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. तालुक्याचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून अनेकांचे उदरनिर्वाह हे शेतीवरच अवलंबून आहेत. या प्रकल्पासाठी जमिनी गेल्याने जमिनीचे अनेक तुकडे होणार आहेत. जमिनीचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. संपादनात अनेक विहिरी जात असल्याने बरेच क्षेत्र कोरडवाहू होणार आहे. एकंदरीतच या प्रकल्पाचा शेतीवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याने सर्वच शेतकरी या प्रकल्पाला विरोध करीत आहेत.
बोरी बुद्रूक (ता. जुन्नर) या ठिकाणी हायस्पीड रेल्वेच्या मोजणीसाठी आलेल्या तहसीलदार व महारेलच्या अधिकाऱ्यांना विरोध करताना शेतकरी.