पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा मुक्काम सत्याग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:26 PM2019-11-19T12:26:11+5:302019-11-19T12:27:15+5:30
पीकविम्याचे पैसे न मिळाल्याने परळीतील शेतकरी पुण्यातील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसमाेर मुक्काम आंदाेलन करत आहेत.
पुणे : परळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा 2018 चा मंजुर खरिप विमा न मिळाल्याने अखिल भारतीय किसान सभा या संघटनेच्या शेतकऱ्यांनी मुक्काम सत्याग्रह केला. पुण्यातील वाकडेवाडी भागातील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमाेर धरणे धरले. जाेपर्यंत पीक विमा मिळणार नाही ताेपर्यंत जागा साेडणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. कंपनीने काही शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे दिले असून अजूनही काही शेतकरी विम्याच्या प्रतिक्षेत आहेत.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2018 च्या पीकविम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. अनेक तांत्रिक कारणे सांगून कंपनी विम्याचे पैसे देण्यापासून टाळाटाळ करत हाेती. त्यामुळे 13 नाेव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या दारात मुक्काम सत्याग्रह सुरु केले. सहा दिवस उलटून गेल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना अद्याप विम्याचे पैसे देण्यात आलेले नाहीत. फाॅर्म चुकीचा भरला, गट क्रमांक चुकीचा आहे अशी विविध कारणे कंपनीकडून देण्यात येत आहेत. त्यावर कंपनीच्या सर्व कागदपत्रांची पुर्तता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जाेपर्यंत विमा मिळणार नाही ताेपर्यंत जागा साेडणार नसल्याचे शेतकऱ्यांनी ठरविले आहे.
परळीवरुन आलेले बाबुराव निर्मळ म्हणाले, गेल्या सहा दिवसांपासून आम्ही आंदाेलन करत आहाेत. परंतु आमच्यातील अनेकांना अद्याप विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. कंपनीकडून अनेक कारणे सांगून पैसे टाळाटाळ केली जात आहे. माझे एक लाख रुपये मिळणे बाकी आहे.
अखिल भारतीय किसान सभा या संघटनेचे विशाल देशमुख म्हणाले, 13 तारखेपासून आम्ही मुक्काम आंदाेलन करत आहाेत. सहा महिन्यापासून पाठपुरवठा केल्यानंतरही कंपनीने शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे दिले नाहीत. 6 नाेव्हेंबरला आम्ही कंपनीला विम्याचे पैसे द्यावेत अशी विनंती करणारे पत्र दिले हाेते. तरीही कंपनीने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही आंदाेलन करण्याचा निर्णय घेतला. परळीतील 16 हजार शेतकरी पीकविम्याच्या प्रतिक्षेत आहेत. 750 शेतकरी या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांच्यातील 199 शेतकऱ्यांना आत्तापर्यंत विम्याचे पैसे कंपनीकडून देण्यता आले आहेत. इतर शेतकऱ्यांना विविध कारणे सांगून विमा देण्यात आला नाही. आज दुपारी आम्ही या संदर्भात आयुक्त कार्यालयावर देखील माेर्चा काढणार आहाेत.