Chandrakant Patil: फडणवीस सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या बँकेबाहेर रांगा; आता केंद्र सरकार सोडून त्यांना कुठेही पैसे मिळत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 04:13 PM2021-11-28T16:13:41+5:302021-11-28T17:07:46+5:30
२०१४ ते २०१९ या काळात शेतकरी बँकेच्या दारावर रांगा लावून उभे असायचे. कारण त्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकारकडून काही ना काही पैसे आलेले असायचे
पुणे : कोव्हीड काळात नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकारने २ - २ हजार रुपयांचे तीन इंस्टॉलमेंट भरले आहेत. एकूण ५४ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरले. २०१४ ते २०१९ या काळात शेतकरी बँकेच्या दारावर रांगा लावून उभे असायचे. कारण त्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकारकडून काही ना काही पैसे आलेले असायचे. आता केंद्र सरकारचे पैसे सोडले तर कुठेही पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामगिरीवर टीका केली.
पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची कुठलीच कामे झाली नाहीत. दोन वर्षाच्या काळात सरकारचा पैसे कमवण्याचा धंदा जोरात सुरू आहे. ज्या मुंबई पोलिसांचं नाव जगभरात घेतले जात होतं, त्या मुंबईचे पोलीस आयुक्तच परागंदा होते. मंत्रिमंडळातील एक तृतीयांश गट कुठल्या ना कुठल्या आरोपांनी चर्चेत आहे. सरकारने आरक्षणाच्या बाबतीत सर्वच समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या दोन वर्षात सरकारने घेतलेले अनेक निर्णय हायकोर्टात टिकले नाहीत, कोर्टाने त्यांना फटकारले आहे. सरकारच्या दोन वर्षाच्या काळात फक्त भ्रष्टाचार सुरू आहे. दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन तर करणारच नाही परंतु निषेध मात्र नक्की करणार आहे.