किसान सन्मानचे पैसे जमाकरून खतांच्या किमती वाढवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:21+5:302021-05-16T04:09:21+5:30

(रविकिरण सासवडे) बारामती: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर, लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती ...

Farmers raised the price of fertilizers by hoarding money | किसान सन्मानचे पैसे जमाकरून खतांच्या किमती वाढवल्या

किसान सन्मानचे पैसे जमाकरून खतांच्या किमती वाढवल्या

Next

(रविकिरण सासवडे)

बारामती: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर, लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. हे म्हणजे शेतकऱ्यांच्या कंबरेचे सोडून त्यांच्याच डोक्याला बांधण्याचा प्रकार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटू लागल्या आहेत.

रासायनिक खतांच्या किमतीचे नियंत्रण पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असते. सलग दुसऱ्यावर्षी कोरोना संकटाचा सामना करत शेतकरीवर्गाकडून खरिपाची तयारी सुरू आहे. तर, बागायती पट्ट्यात देखील याच सुमारास ऊस लागवडी केल्या जातात. नेमकी हीच वेळ साधत रासायनिक खतांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाचे गणित कोलमडणार आहे. कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी शेतमालाला कवडीचीही किंमत मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आगामी हंगामात भांडवल कसे उभे करायचे, या विवनचनेत शेतकरी असतानाच रासायनिक खतांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. इंधनदरवाढीमुळे मशागतीचा देखील खर्च वाढला आहे. आता खतांच्या किमतीसुद्धा वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला येणार आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने किसान सन्मान योजने अंतर्गत तीन महिन्यांतून एकदा २ हजार याप्रमाणे पैसे जमा केले. त्यानंतर लगेच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना मदत केल्यासारखे दाखवून लुटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनानी केला आहे.

-----------------

बारामती येथे माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी युरियाकडे वळू नये. एनपीके खतांचा वापर करावा. केंद्र सरकारला आमची विनंती आहे की, रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात. तसेच, किमती वाढल्यामुळे वेगवेगळी खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत.

-----------------

कोरोना संकट आणि आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या किमती वाढवने म्हणजे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात ढकलण्यासारखे आहे. खराप हंगामावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. देशाच्या अन्नसुरक्षेवर देखील याचा परिणामी होईल. खतांच्या वाढीव किमती तातडीने मागे घेतल्या पाहिजेत किंवा हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्यायला हवे.

- डॉ. अजित नवले

राज्य सरचिटणीस

अखिल भारतीय किसान सभा

-------------------

रासायनिक खतांच्या किमती वाढवणे हा खरेतर देशद्रोह आहे. किमती वाढवल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हाताबाहेर रासायनिक खते जाणार आहेत. परिणामी, गोरगरीब शेतकरी खतांचा वापर करणार नाही. देशाच्या उत्पन्न व उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. देशाचे उत्पादन घटणार असल्याने रासायनिक खतांच्या किमती वाढवणे हा देशद्रोह आहे.

-पांडुरंग रायते

जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, पुणे

--------------------

रासायनिक खतांचे जुने व नवीन दर

खते जुने दर नवीन दर

१०:२६:२६ - १, १७५ - १, ७७५

१२:३२:१६-१,१९०-१८००

२४:२४:०- १,३५०- १,९००

२०:२०:०-९७५- १,३५० ते १,४००

२०:२०:१३-१०५० ते १,०००- १,३५० ते १,६००

डीएपी - १,१८५ ते १,२०० - १,९००

पोटॅश - ८५० - १,०००

Web Title: Farmers raised the price of fertilizers by hoarding money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.