सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी हात वर करून एकमुखी विरोध दर्शवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:51 IST2025-04-05T13:50:29+5:302025-04-05T13:51:02+5:30

उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी गावकऱ्यांनी आमच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवा, असे आवाहन केले

Farmers raised their hands in protest in front of government officials. | सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी हात वर करून एकमुखी विरोध दर्शवला

सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी हात वर करून एकमुखी विरोध दर्शवला

सासवड : पुरंदर तालुक्यातील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित जागेच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग दिला आहे. तेथील सात गावच्या शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भू संपादन प्रक्रिया संदर्भात तीन अधिकाऱ्यांची निवड करून त्यांना थेट गावपातळीवर संवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, पुनर्वसन, परतावा, नोंदी या आणि या सारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर हे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (दि. ३) एखतपूर, मुंजवडी या गावांत भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत सरकारची विमानतळाविषयी भूमिका मांडली.

पुरंदर उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांसह विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कल्याण पांढरे यांनी शेतकऱ्यांना पूर्ण विश्वासात घेऊन, त्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊन देता, फसवणूक न करता, सन्मानपूर्वक भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची भूमिका मांडली तसेच या बाबत गावपातळीवर एक समिती नेमावी, अशी विनंती केली. परंतु गावकऱ्यांनी या प्रकल्पाला आमचा विरोध कायम असल्याची भूमिका मांडली. सर्व उपस्थित बाधित शेतकऱ्यांनी हात वर करून एकमुखी विरोध दर्शवला. सरपंच शीतल टिळेकर, महादेव टिळेकर, संतोष हगवणे, अमोल टिळेकर, बाजीराव मोरे, राजेंद्र निंबाळकर, उपसरपंच तुषार झुरंगे, दिगंबर भामे, नंदा टिळेकर, विलास मोरे, विमानतळ विरोधी समितीचे दत्ता झुरंगे यांसह अनेकांनी यावेळी आपली मते मांडून प्रकल्पाला आमचा कायम विरोध असल्याचे स्पष्ट केले. उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी गावकऱ्यांनी आमच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवा, असे आवाहन केले.

दोन्ही गावांमध्ये विमानतळाविषयी प्रचंड रोष 

एमआयआयडीसीचा या प्रकल्पाबाबतचा मनमानीपणा, शेतीच्या चुकीच्या नोंदी, शेतकऱ्याला या प्रकल्पात गृहित धरून ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा निर्णय, सर्व सात गावांनी ग्रामसभेतून ठराव मंजूर करून केलेला विरोध, गुंजवणीचे पाणी शेतकऱ्याला का विमानतळासाठी, विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी विरोध करणाऱ्या समितीच्या अध्यक्षाबाबत चुकीची भूमिका मांडणे, चाकण येथील विमानतळ रद्द होण्याची कारणे शेतीच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या शेतीची गुणवत्ता अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती यावेळी करण्यात आली. कल्याण पांढरे, प्रांत वर्षा लांडगे, पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी याप्रसंगी प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. बैठकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. बैठकीस महिलांची संख्या लक्षणीय होती. एकूणच आज तरी या दोन्ही गावांमध्ये विमानतळाविषयी प्रचंड रोष व विरोधच दिसून आला.

Web Title: Farmers raised their hands in protest in front of government officials.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.