कांद्याच्या आरणी झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:43+5:302021-05-08T04:10:43+5:30
मागील आठ दिवसापासून वेळोवेळी पावसाचे वातावरण होऊ लागले आहे. यापूर्वी एकदा जोरदार गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांचे ...
मागील आठ दिवसापासून वेळोवेळी पावसाचे वातावरण होऊ लागले आहे. यापूर्वी एकदा जोरदार गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाचे वातावरण सायंकाळच्या वेळी होऊ लागले असून शेतकऱ्यांना शेतातील कांद्याच्या आरणी झाकून ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. सध्या कांदा काढणी वेगात सुरू आहे. काही शेतकरी कांदा काढणीनंतर तो लगेच विक्रीसाठी बाजारात पाठवीत आहे. मात्र समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा उशिरा विक्रीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बराखीची सोय आहे. त्यांनी बराखीत कांदा साठवणीकडे लक्ष दिले आहे. मात्र ज्यांच्याकडे कांदा साठवण्याची व्यवस्था नाही. अशा शेतकऱ्यांचा कांदा शेतातच आरण घालून साठवून ठेवण्यात आला आहे. वारंवार पावसाचे वातावरण होत असल्याने ही आरण झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग होते. प्लास्टिकच्या कागदाने कांदा झाकून ठेवला जातो. बहुतेक वेळा सायंकाळी शेतकरी कांदा झाकून ठेवतो, सकाळी पुन्हा हा कागद काढून बाजूला ठेवला जातो. शेतात कांदा असल्याने शेतकऱ्यांना वारंवार पावसाचा अंदाज घ्यावा लागतो. एकूणच अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतातील कांद्याच्या आरणी झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असते.
पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांना शेतातील कांदा झाकून ठेवावा लागत आहे.