पावसामुळे बाजरीच्या मळणीसाठी शेतकऱ्यांची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:29+5:302021-05-17T04:09:29+5:30
चक्रीवादळाचे परिणाम या भागात दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून वातावरणात बदल झाला आहे. रात्री वेगाने वारे वाहत होते. सकाळी ...
चक्रीवादळाचे परिणाम या भागात दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून वातावरणात बदल झाला आहे. रात्री वेगाने वारे वाहत होते. सकाळी आकाशात अंधारून आले होते. दुपारनंतर पुन्हा जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चारा सुरक्षितरीत्या झाकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या बाजरीची काढणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाची शक्यता निर्माण झाल्यानंतर बाजरी मळणीची कामे शेतकऱ्यांनी तत्परतेने हाती घेतली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ही बाजरी अर्धालीनी दिली आहे. त्यामुळे राखण करणाऱ्यांना उत्पादित बाजरीतील अर्धा हिस्सा दिला जातो. बाजरी कणसाची खुडणी करून शेतात मशीन बोलावून बाजरीची मळणी तत्परतेने करण्यात आली आहे. शेतातील बाजरी तत्परतेने घरी सुरक्षितरीत्या नेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. शेतातील सरमाड तेथेच ठेवून त्यावर प्लास्टिक कागद टाकला जात आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातील जनावरांचा हिरवा चारा आणून तो साठवून ठेवला आहे. दिवसभर वेगवान वारे वाहत असल्याने त्याचा परिणाम शेतीच्या कामावर झालेला आहे.
फोटोखाली: पावसाच्या शक्यतेने उन्हाळी बाजरीची मळणीची कामे तत्परतेने केली जात आहे.