फळबाग योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा : पडवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:10 AM2021-05-21T04:10:30+5:302021-05-21T04:10:30+5:30
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषि कर्जमाफी योजना २००८ नुसार ...
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषि कर्जमाफी योजना २००८ नुसार अल्प भूधारक व सीमांत शेतकरी व अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती या प्रवर्गातील जॉब कार्डधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. योजनेचे निकष पुढीलप्रमाणे, अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी असणे आवश्यक, लाभार्थी जॉबकार्ड धारक, इच्छुक लाभार्थींनी विहित नमुन्यातील अर्ज ग्रामसेवक किंवा कृषी सहायक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामसभेची मंजूरी ठराव व लाभार्थींच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.
वैयक्तिक शेतावर, बांधावर व पडीक जमिनीवर लावण्यासाठी योजनेत समाविष्ट केलेली फळबाग व फळपिके, लागवड कालावधी व अनुदान अदा करण्याची कार्यपद्धती याबाबतची माहिती लाभार्थ्यांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून घ्यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तीन वर्षांसाठी आहे. तीन वर्षांमध्ये ७५ ते ८० टक्के झाडे जिवंत राहिल्यास लाभार्थी १०० टक्के अनुदानासाठी पात्र राहील. कलमे, रोपे ही शासकीय फळरोपवाटिका, कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिका, शासन मान्यताप्राप्त खासगी रोपवाटिका, मनरेगाअंतर्गत ग्रामपंचायतींच्या रोपवाटिका व सामाजिक वनीकरण अन्य शासकीय रोपवाटिकांमधून घ्यावीत.