कर्जाचा डोंगर असहाय्य झाल्याने शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 03:45 PM2019-11-07T15:45:26+5:302019-11-07T15:46:46+5:30
त्याला बारावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळाले होते. पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे तो दोन महिने चाकण येथे हे एका खासगी कंपनीत कामासाठी जात होता.
राजगुरुनगर: कर्ज बाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना किवळे (ता. खेड ) येथे घडली आहे. धनंजय बाळू म्हसे (वय १९ ) अशा या मुलाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहितीनुसार, मुलांचे वडील बाळु बबन म्हसे वय (४३ ) रा किवळे (ता खेड ) यांनी मुलांच्या शिक्षणासाठी हात उसने पैसे घेतले होते. मात्र, शेतात लावलेले बटाट्याचे पीक पावसामुळे खराब झाले.त्यानंतर शेतात धना , मेथी टाकली होती. यातून थोडेफार पैसे मिळतील अशी अशा या शेतकऱ्यांच्या मुलाला होती. मात्र, अवकाळी पावसामुळे धना मेथीचे नुकसान झाले. त्यामुळे हात उसने घेतलेले पैसे फेडायचे कसे, असा प्रश्न या धनंजयला सतावत होता. त्याला बारावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळाले होते. पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे तो दोन महिने चाकण येथे हे एका खासगी कंपनीत कामासाठी जात होता. आई मोलमजुरीचे काम करत होती. कर्जाचा डोंगर वाढल्याने तो नेहमी चिंताचा ग्रस्त असायचा. कर्ज बाजारीपणाला कंटाळून बुधवारी (दि. ५ ) दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजा लोटून वडील रानात गुरे घेऊन चरावयास गेले असताना त्याने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत धनंजयचे वडील बाळू म्हसे खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.