शेतकऱ्याचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय गोफणपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:37+5:302021-09-26T04:10:37+5:30

किंवा शेतकऱ्याचा मुलगा ते गोफणपटू ईंट्रो - गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्लिंग अर्थातच गोफण हा खेळ काही देशांमध्ये ...

Farmer's son to international slinger | शेतकऱ्याचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय गोफणपटू

शेतकऱ्याचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय गोफणपटू

Next

किंवा

शेतकऱ्याचा मुलगा ते गोफणपटू

ईंट्रो - गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्लिंग अर्थातच गोफण हा खेळ काही देशांमध्ये खेळला जात आहे. यंदा स्पेनमध्ये होणाऱ्या गोफण विश्वचषकासाठी पहिल्यांदाच भारतीय संघ पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे अश्मयुगीन काळापासून ओळख असलेल्या गोफणला नवी ओळख मिळाली आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा केशव मंगरुळे हा खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून त्याने यश मिळवले आहे. देशासाठी पदक मिळवण्याबरोबरच पारंपरिक खेळांना जनाधार मिळवा यासाठी तो प्रयत्न करणार आहे.

----------------------------------------------------------------------------

शेतकऱ्याचे शस्त्र म्हणून गोफण अनेक वर्षांपासून ओळखली जाते. अश्मयुगीन काळापासून या शस्त्राचा वापर करण्यात आल्याचे अनेक पुरावे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक लढायामध्ये गोफणीचा वापर केला होता. तसेच, स्वातंत्र्यपूर्व काळातही इंग्रजी राजवटीविरोधात गोफण वापरण्यात आली. वन्य प्राण्यांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी आजही अनेक भागातील शेतकरी गोफण वापरतात. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर गोफळ क्रीडा प्रकार म्हणून पुढे येत आहे. ३४ देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. गोफणच्या आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या असून एकदा विश्वचषक स्पर्धा झाली आहे. पुढील महिन्यात १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान स्पेनमध्ये होणाऱ्या विश्वचषक गोफण स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतभरातून १२ खेळाडू निवडण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील तिडका या गावातील केशव फकिरा मंगरुळे हा २६ वर्षांचा खेळाडूही या स्पर्धेत खेळणार आहे.

केशवचे आईवडील दोघेही शेतकरी. त्याला एक मोठा आणि एक लहान अशी दोन भावंडे आहेत. मोठा भाऊ पेट्रोल पंपावर काम करतो तर लहान भाऊ शेतात आईवडिलांना मदत करतो. मंगरुळे कुटुंबात केशव हाच एकमेव शिकलेला. केशवचा मामा सरकारी अधिकारी होण्यात अपयशी ठरला होता. म्हणून सरकारी अधिकारी व्हावे ही केशव आणि त्याच्या आईवडिलांची इच्छा आहे. गावात शिक्षण घेत असतानाच केशव कबड्डी, खो-खो, व्हाॅलिबाॅल आवडीने खेळायचा. बारावीपर्यंत त्याचे शिक्षण गावातच झाले. पाॅलिटेक्निकचा डिप्लोमा करण्यासाठी तो २०१२मध्ये मुंबईला गेला. मुंबईत मित्राने त्याला काही मर्दानी खेळ शिकवले. तेव्हापासूनच तो या खेळांकडे आकर्षित झाला. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी २०१६मध्ये त्याने पुणे गाठले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आसपासच्या परिसरात मर्दानी खेळांचे प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर त्याने पुण्यात कुंडलिक कचाले यांच्याकडे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अर्थकारण जुळवणे हे प्रत्येकासमोर आव्हान असते. त्यामुळे केशवने पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यात दोन क्लब सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून त्याने पुण्यात राहण्याचा खर्च भागवला. क्लबच्या माध्यमातून तो आजही अनेक मुलांना पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण देत आहे.

एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे मर्दानी खेळ अशा दोन्ही आघाड्यांवर तो मेहनत घेत होता. या काळात त्याने अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली. या स्पर्धांमध्येच त्याला गोफण या खेळाची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने पुण्यात सराव सुरू केला. शिबिरे, कार्यशाळेत सहभागी होऊन खेळाची माहिती घेतली. पुण्यात झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत सर्वोत्तम कामगिरी करून त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. मात्र, केवळ संघात स्थान मिळवून उपयोग नाही. आता या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना स्वत:च खर्च करायचा आहे. भारतीय संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत आहे. केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध न झाल्याने केशवलाही स्पर्धेसाठी दोन लाख रुपयांची जमवाजमव करावी लागणार आहे. पारंपरिक क्रीडा प्रकार, मर्दानी खेळ अशा प्रकारे खेळाचा गौरव केला जात असला तरी खेळाडूंना अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पैशांची जमवाजमव करावी लागणे ही शोकांतिकाच आहे. केशव म्हणतो, भारतीय संघात सहभागी झाल्याचा खूप आनंद झाला. आता पैशांसाठी जमवाजमव सुरू आहे. अनेकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निधीची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. भविष्यात अधिकारी होऊन आईवडिलांचे स्वप्न साकारायचे आहे. तसेच, या पारंपरिक खेळांच्या प्रसारासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

- उमेश जाधव

फोटो - केशव मंगरुळे

Web Title: Farmer's son to international slinger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.