उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचे दांडा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:50+5:302021-06-17T04:08:50+5:30
इंदापूर : इंदापूर शहरात सोलापूरचे प्रभाकर देशमुख आंदोलन करणार असल्याचे समजताच पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र ...
इंदापूर : इंदापूर शहरात सोलापूरचे प्रभाकर देशमुख आंदोलन करणार असल्याचे समजताच पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व कार्यकर्त्यांनी दांडा आंदोलन केले. तालुक्यातील २२ दुष्काळी गावांकरिता उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.
बुधवार ( दि. १६ ) रोजी इंदापूर नगर परिषद प्रांगणातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी ११ वाजता दांडा मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी व कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. इंदापूर पोलिसांना पीआरपीच्या वतीने निवेदन देण्यात आले. इंदापूर शहरात एकाच दिवशी दोन आंदोलने होणार असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.
या वेळी आंदोलनाचे नेते संजय सोनवणे म्हणाले की, इंदापूर तालुक्याला हक्काचे ५ टीएमसी पाणी मिळाले होते. मात्र सोलापूरमधील काही दलाल व स्वयंघोषित नेत्यांनी सुपारी घेऊन आंदोलन केले व आदेश करून रद्द करण्यास शासनावर दबाव आणला व आदेश रद्द करण्यास भाग पाडले. ज्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केले तेच आज इंदापूर तालुक्यात येऊन पाणी सोडवू म्हणत शेतकऱ्यांची चेष्टा करणार असतील तर त्यांना त्याचा जाब विचारण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्यांना जाब विचारण्यासाठी, आम्ही दांडा आंदोलन केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडणाऱ्या आरोपी देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
जिल्हाधिकारी यांनी इंदापूर येथे देशमुख यांना आंदोलनाची परवानगी नाकारली असतानाही, इंदापूर येथे येऊन, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करून, घोषणाबाजी करत आंदोलन केले व जिल्हाधिकाऱ्र्यांचा आदेश डावलून आंदोलन केल्याप्रकरणी आरोपी प्रभाकर देशमुख यांना इंदापूर पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे.
इंदापूर येथे दांडा आंदोलन करताना शेतकरी व पीआरपीचे कार्यकर्ते