जेऊरमध्ये शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:35 PM2018-05-18T12:35:10+5:302018-05-18T12:35:10+5:30
शेतकऱ्याच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे.
नीरा: जेऊर येथील शेतकरी मोहन पांडुरंग तांबे (वय ४२) यांनी राहत्या घरात गुरुवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तांबे यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबे यांचे कुटुंब नुकतेच विभक्त झाले होते. आत्महत्येपूर्वी ते तणावाखाली असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. त्यावेळी ही परिस्थिती हळूहळू बदलू शकते त्यामुळे आत्महत्येसारख्या टोकाचा विचार करू नको असा सल्ला त्यांना मित्रांनी दिला होता. त्याच बरोबर त्यांच्या वाट्याला आलेल्या अल्पशा जमिनीतुन आळंदी पंढरपूर मार्गातील नीरा बायपास रस्ता जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या चिंतेत अजूनच भर पडली होती. तांबे यांच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे. या घटनेविषयी जेजुरी पोलीस ठाण्यात उशिरा माहिती कळविण्यात आली आहे. या घटनेविषयी तत्काळ कोणताही अंदाज बांधणे शक्य नसल्याने तपासाअंती आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तांबे यांच्या पाठीमागे आई,दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.