सुप्यात शेतकऱ्यांनी लिंबू बाजार बंद पाडला, आडतदार यांच्यात शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:11 AM2021-07-29T04:11:22+5:302021-07-29T04:11:22+5:30
सुपे : सुपे येथील उपबाजार समितीच्या आवारात बुधवारी (दि. २८) भरलेला लिंबू बाजार शेतकऱ्यांनी मालाला योग्य बाजार मिळत नसल्याच्या ...
सुपे : सुपे येथील उपबाजार समितीच्या आवारात बुधवारी (दि. २८) भरलेला लिंबू बाजार शेतकऱ्यांनी मालाला योग्य बाजार मिळत नसल्याच्या कारणाने बंद पाडला.
यापूर्वी कागदी लिंबूची खरेदी ही सिमेंट पिशवीच्या गोणीवर केली जात असे. येथील उपबाजारात मागील आठवड्यापासून प्रतिकिलो दराने लिंबू खरेदी करण्याचे बाजार समितीच्या माध्यमातून आडत व्यापाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनी आज (बुधवारी) लिंबू बाजारात शेतकऱ्यांनी आणलेल्या लिंबास प्रतिकिलो ९ रुपये दर देण्याचे ठरविले. मात्र बारामती येथे काल झालेल्या लिंबू लिलावात आडत व्यापाऱ्यांनी प्रतिकिलोस १५ रुपये दर देण्यात आला. तर सुप्यात आडतदारांनी ९ रुपये प्रति किलो काढल्याने शेतकरी आक्रमक झाले. काल झालेल्या बारामती येथील बाजारात आणि सुपे येथे ही तफावत आढळुन आली. त्यामुळे शेतकरी व आडतदार यांच्यात शाब्दिक चकमक होऊन बाजार बंद पाडण्यात आला. त्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आडतदारांना यातून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर काही वेळाने बाजार पूर्ववत सुरु झाला.
अखेर काही वेळाने तणाव निवळल्यावर लिंबू बाजार पूर्ववत सुरु करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आणलेल्या लिंबास प्रति किलोस ५ ते १५ रुपयांपर्यंत बाजार मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तर सरासरी ११ रुपये प्रतिकिलो बाजार मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.