पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; बळीराजाचे ट्रॅक्टर चोरणार्या टोळीचा पर्दाफाश; १० ट्रॅक्टरसह २१ गुन्हे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 07:14 PM2021-05-25T19:14:01+5:302021-05-25T19:15:58+5:30
शिरुर, पारनेर, जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांचे ट्रॅक्टर चोरणार्या टोळीचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश.....
पुणे : शिरुर, पारनेर, जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांचे ट्रॅक्टर चोरणार्या टोळीचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० ट्रॅक्टर, ४ जीप, ६ मोटारसायकल, ६ जनावरे जप्त केली असून बँक, पतसंस्था, एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे ३ गुन्ह्यांसह एकूण २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सतीश अशोक राक्षे (रा. बेलवंडी फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, सध्या रा. शिरुर), ज्ञानदेव ऊर्फ माऊली विनायक नाचबोणे (रा. शिरुर, मुळ औसा, जि़. लातूर), प्रविण कैलास कोरडे(मुळ रा. बोरी, ता. जुन्नर, सध्या रा. शिरुर) आणि सुनिल ऊर्फ भाऊ बिभिषण देवकाते (रा. इस्ले, ता. बार्शी, जि. सोलापूर, सध्या शिरुर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
त्यांच्याकडून ७६ लाख ८८ हजार रुपयांचे १० ट्रॅक्टर, २ पिकअप, २ जीप, ६ मोटारसायकल, ऑक्सिजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, ५ गायी, नट बोल्ट खोलावयाचे पाने असा माल जप्त केला आहे.
याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी माहिती दिली. शिरुर, पारनेर, जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांचे ट्रॅक्टर चोरीचे बरेच गुन्हे या वर्षभरात घडले होते. त्यादृ्ष्टीने तपास करण्याचा आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. शिरुर शहरात आरोपी हे एकत्र फिरतात. ते कोणताही काम धंदा करत नाही. ते वेगवेगळ्या ट्रॅक्टर, पिकअप अशा गाड्या आणतात, अशी माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांनी ट्रॅक्टर चोरल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्याकडून शिरुर, आळेफाटा, नारायणराव, खेड, यवत, मंचर येथील १२ गुन्हे, अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी, पारनेर येथील ८ गुन्हे तर बार्शी येथील १ गुन्हा उघडकीस आला आहे.
असे चोरायचे ट्रॅक्टर
सतीश राक्षे याने जीप विकत घेतली होती. त्याचे कर्ज थकल्याने फायनान्स कंपनीच्या लोकांनी दोन -तीनदा जीप जप्त करुन असे त्याला सांगितले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याचा नातेवाईक प्रविण कोरडे याच्याबरोबर मिळून त्याने कट रचला. त्यासाठी इतर दोघांना बरोबर घेतले. सतीश राक्षे हा रेकी करायचा आणि पुणे नगर सीमेवरील गावात घराबाहेर लावलेला ट्रॅक्टर ते रात्री १२ च्या सुमारास चोरत. रात्रभर तसाच चालवत ते ट्रॅक्टर दुसर्या जिल्ह्यात नेत. हे सर्व जण डायव्हर म्हणून काम करीत असल्याने त्यांना कोणतेही वाहन चालवता येते. सुनिल देवकाते हा गिर्हाईक शोधत असे. त्यांना कर्ज थकल्याने फायनान्स कंपनीने जप्त केलेले हे ट्रॅक्टर आहेत. तुम्हाला कमी किंमतीत देतो. सध्या लॉकडाऊन असल्याने कागदपत्रे नंतर मिळतील, असे सांगत व त्यांच्याकडून निम्मी रक्कम घेत असत.
अशाच प्रकारे त्यांनी पिकअप, जीप चोरुन त्यातून ते रस्त्याकडील दुभत्या गायी चोरुन नेल्या होत्या. या चोर्या पचल्यानंतर त्यांनी पारनेर येथे पतसंस्था, एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, दत्तात्रय तांबे, दीपक साबळे, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरु जाधव, मंगेश थिगळे, संदीप वारे, जितेंद्र मांडगे, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.
शेतकर्यांना त्यांची वाहने तातडीने देणार
डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकर्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरची गरज भासणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या मंजूरीनंतर तातडीने ही वाहने मालकांना परत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता ट्रॅक्टरची काळजी घेण्याचा सल्ला शेतकर्यांना दिला आहे.
शेतकर्यांना दिलासा
चोरट्यांनी नवीन ट्रॅक्टर, जीप चोरुन नेली होती. त्यातील बहुतांशी वाहनांवरील कर्ज अजूनही फिटली नव्हती. हे वाहने पोलिसांनी जप्त केल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकर्यांनी पोलिसांचा यावेळी सत्कार केला.
.......
शेतकरी विठ्ठल खणकर (रा. कावळे पिंपरी, जुन्नर) यांनी सांगितले की, आठ महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर घेतला होता. ५ दिवसांपूर्वी घरासमोरुन चोरीला गेला होता. तो परत मिळाल्याचा आनंद आहे.
सागर ताकवले (रा. पारगाव, दौंड) यांनी सांगितले की, २६ जानेवारीला ट्रॅक्टर घेतला होता. १७ मार्च रोजी चोरीला गेला. ट्रॅक्टर परत मिळण्याची आशा सोडली होती. आज चोरट्यांकडून जप्त केलेला ट्रॅक्टर पाहून डोळ्यावर विश्वासच बसत नाही.
अमोल भोसले (रा. आळेगाव पागा, शिरुर) यांनी सांगितले की, २ महिन्यांपूर्वी माझ्या घरासमोरुन चोरट्यांनी रात्री ट्रॅक्टर चोरुन नेला होता.