‘या ’ गावाची पाणीपट्टी करणार शेतकरीच वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 03:17 PM2019-03-08T15:17:58+5:302019-03-08T15:25:02+5:30
नावीन्यपूर्ण पध्दतीमुळे जलसंपदा विभागाची शेतकऱ्यांकडे असलेली थकीत पाणीपट्टीची रक्कम वसुल होण्यास मदत होणार आहे.
पुणे : गुंजवणी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना दिल्यानंतर पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवरच सोपविली जाणार आहे.या नावीन्यपूर्ण पध्दतीमुळे जलसंपदा विभागाची शेतकऱ्यांकडे असलेली थकीत पाणीपट्टीची रक्कम वसुल होण्यास मदत होणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंजवणी धरण प्रकल्प पूर्ण झाला. धरणातील पाणी अत्याधुनिक पध्दतीने पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या तीन तालुक्यातील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गुंजवणी धरणातून पाईपलाईन करण्यासाठी आवश्यक असलेली निविदा १६ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाली. पाईपलाईनसाठी वेगळ्या प्रकारचे डिझाईन जलसंपदा विभागाने तयार केले आहे. चार वर्षात पाईपलाईनचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच संबधीत ठेकेदारास या पाईपलाईनची पाच वर्ष देखभाल करावी लागणार आहे.
गुंजवणी प्रकल्पातील पाणी शेतक-यांच्या पिकांना देण्यासाठी महाराष्ट्र सिंचन पध्दत व्यवस्थापन कायदा २००५ नुसार ह्यपाणी वापर संस्थाउभारण्यात येणार आहेत. संस्था स्थापनमध्ये शेतकरीच संचालक म्हणून काम करणार आहेत.जलसंपदा विभागाकडून त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देणार आहे. तसेच या पाणी वापर संस्थाच शेतक-यांकडून पाणीपट्टी वसुल करणार आहेत.
पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता प्रविण कोल्हे म्हणाले,गुजवणी धरण प्रकल्पांतर्गत १७८ पाणी वापर सोसायट्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच सोसायट्यामध्ये कार्यरत असलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी वसुल करणे शक्य होईल. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून पाणीपट्टी वसूलीबाबत नवीन पध्दती अवलंबली जात आहे. त्याबाबतचे सादरीकरण औरगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या सूक्ष्म सिंचन कार्यशाळेत करण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.