उजनीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:53+5:302021-05-24T04:09:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बाभुळगाव : इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या पाच टीएमसी पाण्यासाठी नागरिकांचा लढा सुरूच आहे. रविवारी (दि.२३) शहा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभुळगाव : इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या पाच टीएमसी पाण्यासाठी नागरिकांचा लढा सुरूच आहे. रविवारी (दि.२३) शहा (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांनी उजनी जलाशयात खोलवर जात जलसमाधी आंदोलन केले. त्यानंतर धरणाजवळील ग्रामदैवत शंभू महादेव मंदिरापर्यंत दंडवत घालत जात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महादेवाला अभिषेक घालत साकडे घातले.
शहा गावचे माजी सरपंच आबा पाटील यांच्या नेतृृत्वाखाली मौजे शहा येथील उजनी जलपात्रात शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरूवात केली. यावेळी शेतकऱ्यांनी जलाशयातील पाण्यात उतरत साहेब, ताई, दादा, तुम्ही लक्ष घालून प्रश्न सोडवा असे, म्हणत घोषणाबाजी करत इंदापूरच्या पाण्याला विरोध करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचा निषेध केला.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २२ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. परंतु विरोधकांच्या पोटात दुखले. याची अंमलबजावणी होण्याआधीच सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध दर्शविल्याचे माजी सरपंच आबा पाटील म्हणाले.
यावेळी माजी सरपंच विष्णू पाटील, अशोक पाटील, धनाजी देवकाते, लहू निकम, संतोष कडवळे, बाबा गंगावणे, शंकर निकम, योगेश बनसोडे, इरफान मुलांनी, दिलीप नगरे, शैलेश भोई, शरद भुई, पिल्लू गंगावणे, दत्तात्रेय पाटील आदी उपस्थित होते.
फोटो
-शहा येथील ग्रामदैवत शंभू महादेवाला उजनीच्या पाण्याने अंघोळ घालून साकडे घाताना शेतकरी.
-उजनी जलाशय ते शंभू महादेव मंदिरात दंडवत घालत जात असतांना आंदोलक.
- शहा (ता. इंदापूर) येथे उजनी जलपात्रात खोलवर जाऊन आंदोलन करताना आक्रमक शेतकरी.