शेतकरी आठवडे बाजारचाच ‘उठला बाजार’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 11:26 AM2019-03-25T11:26:02+5:302019-03-25T11:31:15+5:30
आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीस बसणा-या विक्रेत्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये आकारले जातात. त्यामुळे काहींनी खोट्या कंपनी स्थापन करून आठवडे बाजार हे उत्पन्नाचे साधन बनवले आहे.
पुणे : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजा व कमी दरात भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शासनाने शेतकरी आठवडे बाजार सुरू केले. मात्र, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत पालिका प्रशासन व पणन संचालक कार्यालयाची परवानगी न घेताच काही नगरसेवकांनी आठवडे बाजार सुरू केले आहेत. पणन विभागाचे या बाजारांवर नियंत्रण नसल्याने बाजारात शेतक-यांऐवजी व्यापारीच भाजीपाला विक्री करत आहेत, त्यामुळे शेतकरी आठवडे बाजाराचा बाजार उठला असल्याचे सध्याचे चित्र आहे.
शेतक-यांना स्वत:ची हक्काची बाजार पेठ उपलब्ध व्हावी. तसेच व्यापा-यांना कमी दराने भाजी पाल्याची विक्री न करता शेतक-यांचे लहान मोठे गट स्थापन करून शेती मालाची विक्री करता यावी, या हेतूने शहरातील विविध भागात पालिका प्रशासन व पणन संचालक कार्यालयाच्या मान्येतेने आठवडे बाजार सुरू करण्यात आले. आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीस बसणा-या विक्रेत्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये आकारले जातात. त्यामुळे काहींनी खोट्या कंपनी स्थापन करून आठवडे बाजार हे उत्पन्नाचे साधन बनवले आहे. काहीही न करता पैसे कमवता येत असल्याने बाजार चालवण्यास मिळवा यावरून चढाओढ लागली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात अनधिकृतपणे सुमारे १२० आठवडे बाजार सुरू आहेत.एका आठवडेबाजारात सर्वसाधारणपणे ४० स्टॉल असतात.परिणामी बाजाराचे आयोजन करणा-या कंपनीला एका दिवसाला १२ हजार आणि महिन्याला ४८ हजार रुपये मिळतात.पणन विभागाच्या परवानगीने सुरू झालेल्या बाजारात विक्रीसाठी येणा-या प्रत्येक विक्रेत्याची तपासणी केली जाते. त्यामुळे शेतकरीच आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारात घेवून येतात.व्यापा-यांना या बाजारात थारा मिळत नाही. मात्र,अनेक नगरसेवकांनी आठवडे बाजारांवर नियंत्रण प्रस्तापित करून शेतकरी आठवडे बाजाराच्या उद्देशाला हरताळ फासला आहे.
पणन विभागाच्या परवानगीशिवाय एकही शेतकरी आठवडे बाजार सुरू करता येत नाही.मात्र,पणन विभाग आणि पालिकेला विचारात न घेता थेट शेतकरी आठवडे बाजार थाटून त्यातून पैसा कमावला जात आहे. पालिकेने आपल्या हद्दीत सुरू झालेल्या आठवडे बाजारावर आक्षेप घेणे अपेक्षित आहे. मात्र,राजकीय दबावामुळे पालिकेच्या अधिका-यांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. नियमानुसार शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करणाची परवानगी मिळालेल्या बाजार आयोजक कंपन्यांना काही नगरसेवकांनी हुसकावून लावले असल्याची माहिती समोर येत आहे.पणन विभागकडूनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
......
महापालिका आणि पणन विभाग यांच्यात अद्याप शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याबाबतचे धोरण निश्चित झाले नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत सुमारे १२० आठवडेबाजार बेकायदेशीरपणे सुरू झाले. कोथरूड, बाणेर आणि पिंपळे सौदागर येथे आमच्या कोरडवाहू उथ्थान फार्मर्स कंपनीच्या माध्यमातून आठवडे बाजार भरविला जात होता. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी आम्हाला हुसकावून लावले. स्वत: आठवडे बाजार ताब्यात घेवून बाजारात शेतकऱ्यांऐवजी व्यापारी बसविण्यास सुरूवात केली. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांच्यातील नाते तुटले.त्यामुळे पालिका व पणन विभागाने यात लक्ष देवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
- सागर उरमुडे, संचालक ,कोरडवाहू उथ्थान फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, अहमदनगर