पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 02:50 PM2022-08-27T14:50:49+5:302022-08-27T14:55:01+5:30
पुणे : कर्जाची वेळेत आणि पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली ...
पुणे : कर्जाची वेळेत आणि पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली असून १ ते ५ सप्टेंबर दरम्यान पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे गरजेचे आहे. ते जोडल्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना लाभ देण्यास सुरुवात केली जाणार आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांत पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. हा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केली आहे, अशांना जास्तीत जास्त रुपये ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी २०१८-१९ किंवा २०१९-२० या वर्षांत घेतलेले कर्ज ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना कर्जाच्या मुद्दलाइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी हा लाभ घेण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे.
आधार कार्ड नसलेल्या अशा पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ ‘आपले सरकार सेवा’ केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड काढावे व ते आपल्या बँकेच्या बचत खात्यास जोडणी करावे. तसेच आधार कार्ड बचत खात्यास जोडलेले नसल्यास त्यांनीही बँकेशी संपर्क साधून आधार कार्ड जोडावे, असे आवाहन पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मिलिंद सोबले यांनी केले आहे.
याबाबत सोबले म्हणाले, ‘कर्ज देणाऱ्या संस्थांकडून तसेच बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती तपासण्याचे काम शासकीय लेखा परीक्षकांकडून केले जात आहे. शेतकऱ्यांच्या संख्येनुसार लेखापरीक्षकांची संख्या वाढविण्यात आली आहे. १ ते ५ सप्टेंबर दरम्यान ही तपासलेली माहिती या योजनेच्या पोर्टलवर टाकली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड दिलेले नाही किंवा बँक खात्याला जोडलेले नाही अशांच्या यादी संबंधित संस्था, बँक, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ५ सप्टेंबरला लावण्यात येणार आहेत. त्यात आधार जोडणीबाबत आवाहन करण्यात येणार आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसही पाठविण्यात येणार आहे.’
ज्या शेतकऱ्यांनी किमान दोन वेळा पूर्ण कर्ज परतफेड केली आहे. अशांना हा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी कोणत्याही दोन वर्षांत पूर्ण कर्ज परतफेड केली आहे अशांना हा लाभ मिळणार आहे.
- मिलिंद सोबले, जिल्हा उपनिबंधक, पुणे ग्रामीण.