शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज;मुरूम येथे ३ मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:21 IST2024-12-21T12:20:09+5:302024-12-21T12:21:20+5:30

सोलर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास शेतीपंपासाठी थ्रीफेज वीजपुरवठा होणार

Farmers will now get electricity during the day; 3 MW solar project inaugurated at Murum | शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज;मुरूम येथे ३ मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचा शुभारंभ

शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज;मुरूम येथे ३ मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचा शुभारंभ

सोमेश्वरनगर : मुरूम (ता. बारामती) येथे मुख्यमंत्री सौर कृषी योजनेंतर्गत ३ मेगावॅटचा सौर प्रकल्प गुरुवार (दि. १९) कार्यान्वित झाला. तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे. या सोलर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास शेतीपंपासाठी थ्रीफेज वीजपुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

सोमेश्वर उपविभागांतर्गत येणाऱ्या मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, करंजे पूल, सोरटेवाडी, मळशी व वायाळपट्टा या गावांतील ११ केव्हीच्या सर्व फिडरला दररोज दिवसा आठ तास थ्री फेज वीजपुरवठा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रात्री शेतात जाण्याचा त्रास वाचणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या योजनेंतर्गत मुरूम ग्रामपंचायतला तीन वर्षांसाठी प्रतिवर्षे पाच लाख रुपये याप्रमाणे १५ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार असून, ग्रामपंचायतीला या निधीतून गावातील अपारंपरिक ऊर्जेची कामे करावी लागणार आहेत.

मुरूम ग्रामपंचायतीने या योजनेसाठी ११ एकर गायरान जागा ग्रामपंचायत ठराव करून उपलब्ध करून दिल्याने हा प्रकल्प मार्गी लागला असल्याची माहिती या प्रकल्पाचे समन्वयक आणि भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश जगताप यांनी दिली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सन २०१९ मध्ये या योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. ग्रामपंचायत जागा, विविध प्रकारच्या परवानग्या, रस्ता, पाणी, पत्रव्यवहार आदी प्रक्रिया पूर्ण करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या नेत्यांच्या सहकाऱ्याने हा प्रकल्प सुरू करण्यास यश मिळाले असल्याची माहिती प्रकाश जगताप यांनी दिली. तसेच महावितरणचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे व अरविंद अंभोरे, सहायक अभियंता प्रज्ञेश जाधव व संदीप जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश लकडे यांचेही सहकार्य मिळाले. सोलर प्रोजेक्टमध्ये असणारे विद्युत खांब व डीपी शिफ्ट करणे, सात किलोमीटर अकरा केव्हीची लाईन ओढणे, शेतकऱ्यांशी चर्चा करून हा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित झाला आहे. यासाठी ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील पदाधिकारी व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. आवादा ग्रीन एनर्जी प्रा. लि. या कंपनीने हे काम पूर्ण केले आहे..

ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद

बारामती तालुक्यातील मुरूम याठिकाणी ३, तर काळखैरेवाडी याठिकाणी ४ मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे यातील मुरूमचा प्रकल्प गुरुवारपासून कार्यान्वित झाला. मुरूम येथून जवळच असलेल्या ३३ /११ केव्ही सोमेश्वर उपकेंद्रास ही वीज जोडण्यात आली आहे. कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे क्रांतिकारी अभियान २०२५ अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.० ही योजना राज्य सरकारने सुरू केले असून, या योजनेला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार असून, रोजगार निर्मिती होणार आहे.

Web Title: Farmers will now get electricity during the day; 3 MW solar project inaugurated at Murum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.