सिद्दीकीच्या बदल्यासाठी फरासखाना स्फोट
By admin | Published: February 21, 2016 03:09 AM2016-02-21T03:09:11+5:302016-02-21T03:09:11+5:30
येरवडा कारागृहात झालेल्या दहशतवादी कतिल सिद्दीकीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सिमीच्या दहशतवाद्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट
पुणे : येरवडा कारागृहात झालेल्या दहशतवादी कतिल सिद्दीकीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सिमीच्या दहशतवाद्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. गुप्तचर विभागाच्या ‘इनपुट’वरून ओडिशा व तेलंगना पोलिसांनी रुरकेला येथे
कारवाई करीत अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात ही माहिती उघडकीस आली.
शेख मेहबूब ऊर्फ गुड्डू ऊर्फ समीर ऊर्फ रमेश शेख इस्माईल (वय २७, रा. गणेश तलाई, खांडवा, मध्य प्रदेश), अमजद ऊर्फ दाऊद ऊर्फ पपू ऊर्फ उमर रमजान खान (वय २७, रा. चिराखादान, खांडवा, मध्य प्रदेश), मोहम्मद अस्लम ऊर्फ बिलाल, जाकीर ऊर्फ सादिक ऊर्फ विक्की डॉन ऊर्फ विनयकुमार बदरूल हुसेन (वय ३२, रा. सेल्स टॅक्स कार्यालयामागे, खांडवा, मध्य प्रदेश) अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. कतिलने श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तेथील पथारी धारकामुळे त्याचा हा प्रयत्न असफल झाला होता. दिल्ली पोलिसांकडून त्याला महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले होते.
कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याने साथीदारांसह येरवडा कारागृहातील अंडा बराकमध्ये कतिल सिद्दीकीचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जंगलीमहाराज रस्त्यावर पाच साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते; मात्र दहशतवाद्यांचा हा प्रयत्न फसला होता; परंतु पुण्यातील फिरोज सय्यदसह काही दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली होती.
फरासखाना पोलीस स्टेशनच्या समोर घडवून आणलेल्या बाँबस्फोटा प्रकरणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू असून, बाँबस्फोटामागील कारणे हळूहळू समोर येत आहेत. यातील आरोपींनी फरासखाना स्फोट आपणच घडविल्याची कबुली दिली असल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत.