मोहक फुले, रोषणाई: विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
By विश्वास मोरे | Published: December 31, 2023 07:15 PM2023-12-31T19:15:33+5:302023-12-31T19:15:52+5:30
विश्वास मोरे कोरेगाव भीमा : पुणे -नगर महामार्गावरील भीमा कोरेगाव (पेरणेफाटा, हवेली) येथील विजयस्तंभ अभिवादन दिन सोहळ्याची तयारी पूर्ण ...
विश्वास मोरे
कोरेगाव भीमा : पुणे -नगर महामार्गावरील भीमा कोरेगाव (पेरणेफाटा, हवेली) येथील विजयस्तंभ अभिवादन दिन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. मोहक रविवारी फुलांची सजावट, रोषणाईने विजयस्तंभ सजविला आहे. कडेकोट बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन, आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. दिवसभर भीम अनुयायांची अभिवादनासाठी गर्दी झाली होती. विजयस्तंभ परिसर गर्दीने फुलून गेला आहे.
कोरेगाव भीमाजवळ पेरणेफाटा (ता. हवेली) येथे विजयस्तंभ आहे. त्याठिकाणी १ जानेवारी रोजी विजय दिन साजरा केला जातो. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी दोन दिवस अगोदरपासून सज्जता ठेवली आहे. पुण्यापासून तर कोरेगावपर्यंत आणि शिक्रापूरपासून कोरेगाव पर्यंतच्या रस्त्यावर उत्सवी वातावरण दिसून आले. निळे झेंडे, येणाऱ्या अनुयायांचे स्वागत करणारे फलक झळकाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणच्या धम्म ज्योती दाखल होतानाचे दिसून आले.
सोहळा सोमवारी असला तरी, जिल्हा प्रशासनाची तयारी आजपासून दिसून आली. दोन दिवस अगोदरपासूनच भीम अनुयायी दाखल झाले आहेत. विविध ठिकाणी सेवा देण्याची सज्जता दिसून आली. शिक्रापूर, थेऊर, वढूपासून तसेच कोरेगावला येणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन केले आहे. आजपासूनच बॅरिकेटिंग केले आहे. पार्किंग आणि आरोग्य यंत्रणाही सज्ज आहे. सोहळ्याचे नेटके नियोजन दिसून आले.
असे आहेत कार्यक्रम
विजयस्तंभास मोहक फुलांची सजावट केली आहे. विदयुत रोषणाईने परिसर उजळून गेला आहे. तसेच एका बाजूने प्रवेश दिला जाणार असून अभिवादनानंतर तीन बाजूनी बाहेर पडता येणार आहे. रविवारी मध्यरात्री अर्थात रात्री १२ वाजता सामुहीक बुध्द वंदना करण्यात येईल. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. तर पहाटे सहा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार व नितीन राऊत हे विजयस्तंभास मानवंदनेसाठी येणार आहेत. समता सैनिक दलाच्या २५० जवानांची मानवंदना आणि भिमगितांचे कार्यक्रम होणार आहेत.
पीएमपीचे अधिकारी सतीश गव्हाणे म्हणाले, 'विजयस्तंभपर्यन्त जाण्यासाठी आठ ठिकाणी डेपो तयार केले आहेत. भीमा कोरेगावला येणाऱ्या विविध बस, खासगी वाहनातून आल्यानंतर त्यांना स्तंभापर्यंत जाण्यासाठी सेवा उपलब्ध करून दिली आहे.''
डॉ नीलिमा इनामदार म्हणाल्या, ''आरोग्य विभागाच्या वतीने तयारी केली आहे. १२५ कर्मचारी सज्य आहेत, तसेच पॅरामेडिकल इतर स्टाफही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्र सुरु केली आहेत. तसेच रुग्णवाहिका आणि ३५ डॉक्टर पथक सज्य आहे. ''