हिंजवडी आयटी पार्कसाठी जलद मेट्रो : ३६ महिन्यांत काम होणार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 07:27 PM2018-12-17T19:27:35+5:302018-12-17T19:32:45+5:30

२४ किलोमीटरची मेट्रोलाईन तयार करण्यासाठी साधारण ४ वर्ष लागतात. परंतु, हिंजवडी क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचा उद्दिष्ट ठेवले आहे.

Fast Metro for Hinjewadi IT Park: Complete work will be within 36 months | हिंजवडी आयटी पार्कसाठी जलद मेट्रो : ३६ महिन्यांत काम होणार पूर्ण

हिंजवडी आयटी पार्कसाठी जलद मेट्रो : ३६ महिन्यांत काम होणार पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्दे पंतप्राधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपुजनटाटा व सिमेन्स कंपन्यांना एक सोबत वर्कऑर्डरपीएमआरडीएची हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो-३ ही ऐतिहासिक मेट्रो ठरणार या मेट्रोचा नक्कीच उद्योजक व आयटीमधील नागरिकांना फायदा होणार

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) देशातील पहिल्या पीपीपी तत्वावरील मेट्रो लाईन - ३चा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथे मंगळवारी (दि. १८) रोजी सायंकाळी ४.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. वेगाने विकसित होणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कसाठी मेट्रोचे काम येत्या ३६ महिन्यांत जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.
बालेवाडीतील होणाऱ्या या कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दुपारी घटनास्थळ आणि सुरक्षा व्यवसस्थेची पाहणी केली. 
याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, संग्राम थोपटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, स्थानिक नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.  
टाटा व सिमेन्स कंपन्यांना एक सोबत वर्कऑर्डर देण्यात आली आहे. आता कोणत्याही उप ठेकेदार किंवा अन्य निविदा प्रक्रिया शिल्लक नाही. २४ किलोमीटरची मेट्रोलाईन तयार करण्यासाठी साधारणत: ४ वर्ष लागतात. परंतु, हिंजवडी क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचा उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट टाटा व सिमेन्स कंपन्यांनी मान्य देखील केले आहे.


...................
हिंजवडीतील सात गावांसाठी १ टीएमसी पाणी पुरवणार
हिंजवडी आयटी पार्क मुळे या परिसरातील ७-८ गावांची लोकसंख्या झपाट्याचे वाढत आहे. पुढील १० वर्षात ही लोकसंख्या १० लाखांहून अधिक होईल. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न या भागात निर्माण होत आहे. राज्यशासनाने पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सचिव स्तरीय समिती स्थापन केली आहे. पिरंगुट व सात गावे पाणी पुरवठा योजनेसाठी पीएमआरडीए १ टीएमसी क्षमतेचा पाणीपुरवठा प्रकल्प लवकरच राबविणार आहे. या प्रकल्पासाठी २०० कोटी रूपये निधीची मान्यता प्राधिकरणाने दिली आहे, असे किरण गित्ते यांनी सांगितले.
....................
पुणे महानगर क्षेत्राचा विकास करण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सोबत घेऊन विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करेल. हिंजवडी आयटी पार्कची वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रो प्रकल्पासोबतच महाळुंगे हिंजवडी रोड, पाषाण-सूस-चांदे-नांदे रोड, भूमकर चौक हिंजवडी रोड, घोटावडे-माण रोडचे काम देखील पुढील १ वर्षात पूर्ण करण्यात येईल. 
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडी.
....................
पीएमआरडीएची हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो-३ ही ऐतिहासिक मेट्रो ठरणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून जवळपास ३० हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. या मेट्रोचा नक्कीच उद्योजक व आयटीमधील नागरिकांना फायदा होणार आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग व सुसज्ज वाहतूक व्यवस्था केलेली आहे. - गिरीश बापट, पालकमंत्री

Web Title: Fast Metro for Hinjewadi IT Park: Complete work will be within 36 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.