सारथीसमोर उपोषण करणाऱ्या तरुणीची तब्येत बिघडली ; बेशुद्ध पडल्याने रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:14 PM2020-02-25T14:14:16+5:302020-02-25T14:18:02+5:30
निवड झालेल्या उमेदवारांना एक महिन्यांचे प्रशिक्षण देऊन प्रत्येकी १८ हजार रुपयांच्या मानधनावर नियुक्ती देण्यात आल्या. परंतु सध्या सुरु असलेल्या चौकशीमुळे ३२५ तारादुतांना मानधनच मिळालेले नाही.
पुणे : एक मराठा.. लाख मराठा... तारादुतांचे मानधन त्वरीत मिळालेच पाहिजे... मराठा समाज्याच्या हितासाठी स्थापन झालेली सारथी संस्था वाचवा.... तारादुत प्रकल्प सुरु ठेवा... कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही... अशा जोरदार घोषणाबाजी करत सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर सोमवारपासून संपूर्ण राज्यातून आलेल्या तारादुतांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र या उपोषणातील एका तरुणीची प्रकृती बिघडली असून तिला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सारथी संस्थेच्या वतीने सारथीचे कार्य, योजना तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी, नागरिकांचे संविधानिक हक्क व कर्तव्ये, राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा, जातिभेद, अंधश्रध्दा, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरण, कौटुंबिक हिंसाचार आदी बाबत जनजागृती करण्यासाठी तारादूत प्रकल्पा अतंर्गत प्रत्येक तालुक्यात मानधनावर तारादुतांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी लेखी जाहिरात देऊन प्रत्येक जिल्ह्यांतून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर लेखी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या.
निवड झालेल्या उमेदवारांना एक महिन्यांचे प्रशिक्षण देऊन प्रत्येकी १८ हजार रुपयांच्या मानधनावर नियुक्ती देण्यात आल्या. परंतु सध्या सुरु असलेल्या चौकशीमुळे ३२५ तारादुतांना मानधनच मिळालेले नाही. तर परीक्षा, मुलाखती आणि प्रशिक्षण घेतलेल्या १५५ उमेदवारांना अद्याप नियुक्त्या देखील देण्यात आलेल्या नाहीत. दोन महिन्यांचे मानधन त्वरीत जमा करावे व शिल्लक लोकांना नियुक्त्या देण्याची मागणीसाठी सारथी संस्थेच्या बाहेर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू होते.
त्यात बुलढाणा जिल्ह्यात तारादूत म्हणून काम करणाऱ्या श्रद्धा म्हस्के यांना चक्कर आली आणि पोटात काही नसल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. ही घटना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून आपल्या मागण्यांवर उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.