भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईसाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:22 AM2018-08-19T01:22:38+5:302018-08-19T01:22:53+5:30
पणदरे ग्रामपंचायतीतील प्रकार : सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांचे चार दिवसांपासून आंदोलन
सांगवी : पणदरे (ता. बारामती) येथील ग्रामसेवक यांनी शासनाच्या विविध योजना व ग्रामपंचायतीमधील केलेला भ्रष्टाचार उघडकीस येऊनही कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे गेल्या चार दिवसांपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
पणदरे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अफरातफर, गैरव्यवहार, अपंग कल्याण ३ टक्के निधी, महिला बालकल्याण १० टक्के निधी, मागासवर्गीयांच्या १५ टक्के निधी, मागील अनुशेष खर्च न करणे, दोन वेळा शौचालय देणे व इतर प्रकरणात अफरातफर, गैरव्यवहार, वारंवार झालेल्या भ्रष्टाचाराचे एकूण १५० पुरावे दिले आहेत. या प्रकरणांचा चौकशी अहवाल येऊनही गटविकास अधिकारी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्याने आमरण उपोषणास बसल्याचे विक्रम कोकरे यांनी सांगितले.
शनिवारी सायंकाळी उपोषणस्थळी पंचायत समिती सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी भेट दिली.
दरम्यान, कोकरे यांच्या उपोषणाला राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रासपच्यावतीने देण्यात आला आहे. शनिवारी (दि. १८) रासपचे बापूराव सोलनकर, संपतराव टकले, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष निखिल देवकाते, दिलीप कोकरे आदींनी कोकरे यांची भेट घेतली.
गटविकास अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईची मागणी...
बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी पॉकेट संस्कृतीची जोरदार अंमलबजावणी राबविल्यामुळे कारवाई थंडावत आहेत. भ्रष्टाचार, गैरव्यवहार करणाºयांच्या मागे ठामपणे उभे राहून, मोकाट सोडून दिले जात असल्याने चोरांचा बाजार झाला आहे, असा आरोप विक्रम कोकरे यांनी केला आहे. शासनपत्रक ४ जानेवारी २०१७ नुसार पणदरे ग्रामसेवक यांच्या चौकशीच्या प्रकरणाला जाणूनबुजून विलंब केल्याने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी काळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही कोकरे यांनी केली आहे.
डॉ. उमेश नाईक यांना निलंबित करा...
सिल्व्हर ज्युबिली येथील डॉ. उमेश नाईक यांनी कोकरे यांची परिस्थिती खालावली असल्याचे सांगितल्याने शनिवारी (दि. १८) मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. बारामती सिल्व्हर ज्युबिलीत वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या दबावाला बळी पडून वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करून खोटा अहवाल सादर केला. कोणत्याही प्रकारचा अहवाल न दाखवता तब्येत बिघडली असल्याची तोंडी माहिती दिली. तसेच, रात्री-बेरात्री आहे त्या ठिकाणी चालत माघारी पाठवण्यात आले. मात्र खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता काहीही झाले नसल्याचे निष्पन्न झाले, असा आरोप विक्रम कोकरे यांनी केला आहे. यामुळे सिल्व्हर ज्युबिली येथे खोटी तपासणी केलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश नाईक यांचे निलंबन करण्यात यावे, अशीही मागणी कोकरे यांनी केली आहे.
कोहिनकर यांनी नेमलेली समिती निर्णय घेईल
पणदरे ग्रामसेवक यांनी मागील अनुशेष खर्च केलेला आहे. यासाठी विस्तार अधिकारी लाखे व चांदगुडे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांचे अहवाल कोकरे यांना मान्य नव्हते. त्यानंतर पुन्हा दौंडच्या विस्तार अधिकाºयांची नेमणूक केली असता त्यांचेही अहवाल त्यांना मान्य झाले नाहीत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहीनकर यांनी नेमलेली समिती त्यावर निर्णय घेईल, असे बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले.