पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:58 PM2019-04-01T23:58:45+5:302019-04-01T23:59:00+5:30
गुरुवारी २८ मार्च रोजी अवैधरीत्या वाळूउपशाची बातमी करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांना वाळूमाफियांकडून मारहाण करण्यात आली आहे.
सांगवी : शिर्सुफळ (ता. बारामती) येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती येथे आमरण उपोषण करण्यात आले.
यामध्ये बारामती तालुका पत्रकार संघ, पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आदी संस्थांच्या वतीने घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
गुरुवारी २८ मार्च रोजी अवैधरीत्या वाळूउपशाची बातमी करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांना वाळूमाफियांकडून मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये फिर्यादी महेश बालदत्त आटोळे व केशव शेलार यांना शिवीगाळ करत पिस्तूलाचा धाक दाखवून
केमरा मोबाईल, ओळखपत्र, पैसे काढून घेऊन त्यांच्याच खिशातील पैसे हातात ठेऊन दबाव टाकत पैसे घेत असल्याबाबतचा व्हिडीओ काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार शिर्सूफळ येथे घडला होता.
याबाबत आरोपी गणेश गाढवे, सचिन आटोळे यांच्यासह नऊ जणांविरुध्द बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पत्रकारांच्या विरोधात ही खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केलेला त्वरीत रद्द करा, तलावातील अवैध वाळू उपसा करून गणेश गाढवे, सचिन आटोळे, विठ्ठल गाढवे, दत्तात्रय आटोळे यांच्यावर पर्यावरणाची हानी व वाळू चोरीचा गुन्हा दाखल करावा इतर नऊ आरोपीना त्वरित अटक करावी, शिर्सुफळ गावात वैध वाळू उपसा बंद करण्यासाठी संयुक्त चेक पोस्ट त्वरीत लावावे.
यावेळी माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्रात राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप लगड, भारीप पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगलदास निकाळजे, योगेश महाडिक, कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी विक्रम थोरात, अक्षय शेलार, मयुर कांबळे, चैतन जाधव आदी उपस्थित होते.
४सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी, आर्मी अॅक्टचा कलम लावण्यात यावा, या आरोपींना जामीन कसा झाला, याची सखोल खात्या अंतर्गत चौकशी करावी, तपास अधिकारी त्वरित बदलून तपास कार्यक्षम अधिकारी यांच्याकडे देण्यात यावा. अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.