उद्याचे भाजपा खासदारांचे उपोषण म्हणजे ढोंग - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 17:26 IST2018-04-11T17:26:09+5:302018-04-11T17:26:09+5:30
लोकसभा विरोधक नाही तर सत्ताधारी चालवत असतात. मात्र तरीही विरोधकांनी अधिवेशनाचे कामकाज चालू दिले नाही म्हणून उद्या (दि.12) भाजपाचे खासदार करत असलेले उपोषण हे ढोंग असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

उद्याचे भाजपा खासदारांचे उपोषण म्हणजे ढोंग - सुप्रिया सुळे
पुणे : लोकसभा विरोधक नाही तर सत्ताधारी चालवत असतात. मात्र तरीही विरोधकांनी अधिवेशनाचे कामकाज चालू दिले नाही म्हणून उद्या (दि.12) भाजपाचे खासदार करत असलेले उपोषण हे ढोंग असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेच्या पुण्यातील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, आज महात्मा फुलेंची जयंती आहे. त्यानिमित्त फुले दांपत्याला त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल भारतरत्न 'किताब देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. आज ती घोषणा होईल असे वाटले असताना संपूर्ण भाजपाचे खासदार उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. पुढे त्या म्हणाल्या की, पाच आठवडे अधिवेशन सुरू असताना भाजपा खासदारांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्याची गरज होती. पण अधिवेशन झाल्यावर करण्यात येणारे उपोषण म्हणजे खोटं आहे. साडे नऊ ते पाच वाजेपर्यंत उपोषण नाश्ता करून सुरू करतील असा टोलाही त्यांनी लगावला. इतकेच नव्हे तर मी असते तर निदान 9 ते 9 असे बारा तास उपोषण केले असते असेही त्या म्हणाल्या. नवरात्रीत नऊ दिवस उपवास केला जातो त्याप्रमाणे अजून एक दिवस केला तर 'कौनसा तीर मारा' असेही त्या म्हणाल्या.