राहूबेटात उपोषणाची वेळ : थोरात
By Admin | Published: June 3, 2016 12:41 AM2016-06-03T00:41:37+5:302016-06-03T00:41:37+5:30
राहूबेटातील दहिटणे येथील विविध विकासकामांच्या मागण्यांसाठी कार्यकर्त्यांवर उपोषण करण्याची वेळ आली असल्याचे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
राहू : राहूबेटातील दहिटणे येथील विविध विकासकामांच्या मागण्यांसाठी कार्यकर्त्यांवर उपोषण करण्याची वेळ आली असल्याचे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
दहिटणे (ता. दौंड) येथे उमेश म्हेत्रे यांनी दहिटणे परिसरातील मुळा-मुठा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला संरक्षक कठडे बसविणे, दहिटणे ते राहू व दहिटणे ते मिरवडीदरम्यान रस्त्यावरील खड्डे व दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे काढणे व दहिटणे स्मशानभूमी परिसरातील खड्डे बुजवणे तसेच सहजपूर, नांदूर, खामगाव, दहिटणे, देवकरवाडी परिसरातील महावितरण कंपनीच्या वीजवाहक तारा खराब झाल्या असून, वेळोवेळी वीज खंडित होऊन या भागातील शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद असतात यासह अन्य काही मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात तीन दिवस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर उपोषण सुरू ठेवले होते. हे उपोषण मागे घ्यावे म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रमणध्वनीवरून उपोषणार्थीला विनंती केली. तर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी प्रत्यक्ष भेटून विनंती केल्यानंतर रमेश थोरात यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेतले. याबाबत उमेश म्हेत्रे म्हणाले, की विद्यमान प्रतिनिधींनी याबाबत साधी चौकशी केली नाही, ही खेदाची बाब आहे. मी काही माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी उपोषण केले नसून, सामाजिक बांधिलकी म्हणून उपोषण केले आहे. या वेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, सरपंच सुनंदा पिलाणे, नितीन दोरगे, बाजार समितीचे बाळासाहेब थोरात, दिलीप हंडाळ, रावसाहेब पिलाणे, भास्कर देवकर पोलीस पाटील नवनाथ धुमाळ, विकास मगर, देवकरवाडीच्या सरपंच ज्योती खळदे, कोंडिबा शेळके, देवराम कोळपे, विलास कोळपे, बापू शितोळे, बापू होले, उपसरपंच लक्ष्मण शिंदे, अंकुश शितोळे व मान्यवर उपस्थित होते.
(वार्ताहर)