पारगावातील शिक्षकाच्या म्हशीच्या दुधाची फॅट चक्क १८ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:40+5:302021-05-11T04:11:40+5:30
-- केडगाव : पारगाव येथील प्राथमिक शिक्षक यांच्या म्हशीच्या दुधाला अमोल दूध डेअरीने उच्चांकी ८१.१६ रुपये प्रति लिटर ...
--
केडगाव : पारगाव येथील प्राथमिक शिक्षक यांच्या म्हशीच्या दुधाला
अमोल दूध डेअरीने उच्चांकी ८१.१६ रुपये प्रति लिटर भाव दिला आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या म्हशीच्या दुधाची फॅट (स्निग्धता) चक्क १८ इतकी आहे. हा फॅट उच्चांकी पेक्षाही सहाने जास्त असल्याने त्यांना आजचा दुधाचा दर तब्बल ८१.१६ रुपये इतका मिळाला.
शहाजी गिरे असे या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे. गिरे यांच्याकडे ७ म्हशी आहेत. शिक्षकाची नोकरी करत असताना घरातील व्यक्तीची मदत घेऊन ते हे पशुपालनाचा व्यवसाय पूर्वीपासून करत आहे. म्हशींचे संगोपन करत असताना त्यांना वेळच्या वेळेस स्वछ अंघोळ घालेणे, उत्तम चारा, उसाची कुट्टी, मका, गोळी, सरकी पेंड देणे. सुसज्ज व भव्य गोठा त्यामध्ये फॅनची सोय अशा अनेक गोष्टींचा विचार करून गिरे जनावरांची काळजी घेत असतात.
त्यांच्याकडे मुऱ्हा, जाफराबाद, मुंडा या प्रजातीच्या म्हशी दूध देण्यासाठी खूप किफायतदार असतात. दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधाची चव, स्वाद बऱ्याच प्रमाणात दुधातील स्निग्धांशावर अवलंबून असतो. दुधाची किंमत स्निग्धांशावर ठरवली जाते. महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधात किमान फॅट ३.८, तर म्हशीच्या दुधात फॅट ६ असते. परंतु शहाजी गिरे यांच्या म्हशींची अक्षरशः फॅट ही चक्क १८ लागली आहे. दुधाची एवढी फॅट लागल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
--
चौकट
निगा राखणे महत्त्वाचे
यासंदर्भात, शहाजी गिरे म्हणाले की, जनावरांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे, वर्षभर जो चारा उपलब्ध असेल तो जनावरांना खाऊ न घालता, चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा. दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण वाढविण्यासाठी ॲसिटिक आम्ल महत्त्वाचा घटक आहे. हे आम्ल तयार होण्यासाठी सुक्या चाऱ्यातील सेल्युलोज महत्त्वाचे आहे. आहारात उसाचा जास्त वापर टाळावा. आहारात सरकीच्या तेलाचा अंश असल्यास फॅटमध्ये थोडी वाढ होते. परंतु, खाद्यातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण वाढल्यास पचनक्षमतेवर वाईट परिणाम होऊन दुधातील प्रथिनांमध्ये घट येते. दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त १२ तासांचे अंतर असावे. म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मका भरडा, तूर, हरभरा, मूगचुनी, भात, गव्हाचा कोंडा इ. योग्य प्रमाणात द्यावा.
--
फोटो १० केडगाव पारगाव दूध
फोटो ओळी : पारगाव येथे दूध ओतताना प्राथमिक शिक्षक व दुग्धव्यवसायिक शहाजी गिरे