खंडाळा घाटात भीषण अपघात, कारची अज्ञात वाहनाला धडक; पाच ठार, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:33 AM2022-11-18T10:33:13+5:302022-11-18T10:33:47+5:30
या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत
लोणावळा (पुणे) :मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील उतारावर किमी 37 जवळ रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. एक महिला या अपघातात सुदैवाने वाचली आहे.
या अपघातात अब्दुल रहमान खान (32 रा. घाटकोपर), अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी (रा.राजापूर, जि. रत्नागिरी), राहुल कुमार पांडे (30, रा. कामोठे. नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गाडेकर (23 म्हातारपाडा, मुंबई) हे मयत झाले असून मच्छिंद्र आंबोरे (38 - चालक), अमीरउल्ला चौधरी, दिपक खैराल हे जखमी झाले असून अस्फीया रईस चौधरी (25, कुर्ला, मुंबई) ह्या सुखरुप बचावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईकडे जाणारी कार क्र. (MH 14 EC 3501) मध्ये चालक अधिक आठ प्रवासी होते. सर्व प्रवासी हे वेगवेगळ्या ठिकाणहून मुंबईकडे जाण्यासाठी कार मधून प्रवास करत होते. सदर कार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावचे हद्दीत किलोमीटर 37.00 येथे आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की त्यामध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एक महिला किरकोळ जखमी झाली असून चार जणांना गंभीर इजा झाल्या कारणे एमजीएम रुग्णालय कामोठे येथे नेण्यात आले. त्यादरम्यान त्यातील एक जणांचा मृत्यू झाला आहे.
चालक आणि इतर दोघा जणांवर उपचार सुरू आहेत. रात्री 11वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान हा अपघात झाला. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असून अपघात स्थळी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले इत्यादीने भेटी देत या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.